नागझिरा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी
By Admin | Updated: January 1, 2015 22:55 IST2015-01-01T22:55:41+5:302015-01-01T22:55:41+5:30
विदर्भाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या नागझिरा अभयारण्यात शेकडो पर्यटक गर्दी करीत आहेत. यामुळे वनविभागाला लाखो रूपयाचा महसूल मिळत आहे.

नागझिरा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी
संजय साठवणे - साकोली
विदर्भाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या नागझिरा अभयारण्यात शेकडो पर्यटक गर्दी करीत आहेत. यामुळे वनविभागाला लाखो रूपयाचा महसूल मिळत आहे.
भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील साकोली येथून २२ कि़मी. अंतरावर नागझिरा व्याघ्रप्रकल्प आहे. सन १९६८-६९ मध्ये हे अभयारण्य भंडारा जिल्ह्याचे अभयारण्य म्हणून घोषित झाले होते. मात्र दिवसेंदिवस वाघांची व इतर वन्यप्राण्यांची संख्या पाहता मागील पाच वर्षापुर्वी या अभयारण्याला नागझिरा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळही वाढविण्यात आले आहे. पुर्वी नागझिऱ्याचे क्षेत्रफळ १५२.८१ चौरस मीटर होते. यापूर्वी पिटेझरी, कोसमतोंडी, मुरपार, मुरहोली, मंगेझरी, आलेझरी, चोरखमारा हे प्रवेश रस्ते होते. आता यात उमरझरी हा एक नवीन प्रवेश रस्ता तयार करण्यात आला आहे.
आॅनलाईन बुकींगची सोय उपलब्ध
पुर्वी नागझीरा येथे प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वारावर जावूनच बुकींग करण्याची सोय होती. त्यामुळे बाहेरगावच्या पर्यटकांची बुकींग होत नव्हती. त्यामुळे आता आॅनलाईन बुकींगची सोय झाल्यामुळे पर्यटकांना ते सोयीचे झाले आहे.
पिटेझरीतच होते नागझिराचे दर्शन
पिटेझरी येथे ईको टुरीझम तयार करण्यात आले आहे. या ईको टुरीझमध्ये नागझिरा जंगलातील पक्षी, प्राणी व झाडांची इंतभुत माहिती छायाचित्रासह दर्शविण्यात आली असून ग्रामीण संस्कृतीचेही दर्शन या इको टुरीझममध्ये होते.
सुरक्षा योजना नाही
नागझीरा अभयारण्यात प्रवेश करताना चेकपोस्टवर पर्यटकांची नावे, गाडीचा नंबर यासह इतर बाबी नोंदविली जातात. तसेच नियमानुसार प्रवेशही घेतली जाते. मात्र वाहण तपासल्या जात नाही. तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी असलेला वनविभागाचे कर्मचारी संख्या कमी आहे. ती वाढविण्याची गरज आहे.