पवनी तालुक्याचा पर्यटन विकास रखडला
By Admin | Updated: March 24, 2017 00:32 IST2017-03-24T00:32:38+5:302017-03-24T00:32:38+5:30
पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना दररोज पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत आहेत.

पवनी तालुक्याचा पर्यटन विकास रखडला
पर्यटकांच्या संख्येत वाढ : विकासासाठी आणखी किती दिवस करायची प्रतीक्षा?
पवनी : पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना दररोज पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत आहेत. शहराचा व तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलविण्याची क्षमता येथील पर्यटनात आहे. पर्यटनप्रेमी व तरूणवर्ग येथील पर्यटनाकडे ‘टुरीझम डेव्हलपमेंट’च्या नजरेने बघत आहेत. परंतु राज्य व केंद्र सरकार येथील पर्यटन विकासाकरिता पुढाकार घेत नसल्यामुळे येथील पर्यटनाचा विकास रखडलेला आहे.
पवनीत विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द राष्ट्रीय धरण, रूयाड येथील आंतरराष्ट्रीय स्तराचा महासमाधी स्तूप, उमरेड-करांडला अभयारण्य, पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्र, शहरातील प्राचीन ऐतिहासिक किल्ला, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, धरणीधर गणेश मंदिर, टेंभेस्वामी मंदिर, रांझीचा गणपती, वैजेश्वर मंदिर आदी पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
मागील तीन-चार वर्षांपासून पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. पवनी शहर व तालुक्याची ओळख राज्य व राष्ट्रीयस्तरावर पर्यटनस्थळाच्या रूपात होत आहे. या शहराचा रामटेकच्या धर्तीवर पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शहराला गतवैभव देण्यासाठी पर्यटनक्षेत्राचा विकास करण्याची गरज आहे. शहरात व तालुक्यात पर्यटन वाढीकरिता सर्व आहे. परंतु पर्यटनवाढीकरिता नियोजन झाले नाही. मार्केटिंग नसल्यामुळे राज्य व केंद्रस्तरावर येथील पर्यटनस्थळाना प्रसिध्दी मिळाली नाही. येथील पर्यटन स्थळाला शासनाच्या महत्वाचा विकास करणे, पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार करुन शासनाकडे पाठविणे गरजेचे आहे. पण येथील पर्यटन विकासाकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे येथील पर्यटन विकास रखडला आहे. (शहर प्रतिनिधी)