पर्यटन विकास केवळ एक टक्का

By Admin | Updated: September 27, 2016 00:29 IST2016-09-27T00:29:27+5:302016-09-27T00:29:27+5:30

नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या भंडारा जिल्ह्यात पर्यटनस्थळाच्या विकासाबाबत मात्र नशिब बलवत्तर नाही.

Tourism development is only one percent | पर्यटन विकास केवळ एक टक्का

पर्यटन विकास केवळ एक टक्का

आज विश्व पर्यटन दिवस : मिळाला फक्त एक कोटीचा निधी
इंद्रपाल कटकवार भंडारा
नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या भंडारा जिल्ह्यात पर्यटनस्थळाच्या विकासाबाबत मात्र नशिब बलवत्तर नाही. जिथे शंभर कोटींच्या वर निधी उपलब्ध व्हायला हवा तिथे फक्त एक टक्का निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा निधी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे.
दि. २७ सप्टेंबर हा दिवस विश्व पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची होत असलेली सातत्याने उपेक्षा व गरज यावर लोकमतने उहापोह केला असता निधीचा वाणवा व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या दोन गोष्टी प्रखरतेने जाणवल्या.
पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन २०१५- १६ मध्ये एकूण २२५ कोटींचा निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. त्यापैकी ७० टक्के निधी उपलब्ध करण्यात आला असून त्यापैकी भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला एक कोटी रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता देवून मंजूर करण्यात आला आहे. यात भंडारा जिल्ह्यातील वाही जलाशय, जंगल येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याकरिता ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच बालसमुद्र व बुध्दीष्ट आॅर्चिलॉजीकल साईट पवनी येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठीही ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

विदर्भाची काशी दुर्लक्षित
भंडारा जिल्ह्याचा इतिहास फार प्राचीन आहे. प्राचीन मंदिराची नगरी विदर्भाची काशी म्हणून पवनी यासोबतच धार्मिक श्रध्दास्थान असलेले गायमुख, चांदपूर, श्री नर्सिंग टेकडी (माडगी), कोरंभी, रावणवाडी जलाशय, अड्याळ येथील हनुमंत मंदिर, प्रतापगड टेकडी, चकारा देवस्थान, लाखापाटलाची पहाडी (कोका जंगल), अंभोरा, दुर्गाबाई डोह (गडकुंभली), ढिवरढूटी (पवनी), चप्राड (पहाडी), दशबल पहाडी (हत्तीडोई), पांडे महाल भंडारा, झिरी, बंदरझिरा, सोनी नदी संगम, गिरोला पहाडी, श्री भृश्रृंड गणेश मंदिर भंडारा, ढुढरी जलाशय, मागली बांध, उत्तर वाहणी, मांढळ, डाकराम सुकडी, कामठा आश्रम, चारभट्टी (पुयार), सिंदपूरी-रुयाड, खोडगाव, चौंडेश्वरी देवी मोहाडी, आंबागड यासह अनेक पर्यटन स्थळे जिल्ह्यात आहेत. मात्र जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची उपेक्षा सातत्याने होत आहे.

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत जिल्ह्याला एक कोटींचा निधी मिळाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासाबाबत विकास आराखडा व प्रारुप तयार करण्यात आला आहे. त्या दृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे.
- राजेश गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी, भंडारा
विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात येतो. विदर्भाला कधीही झुकते माप दिला जात नाही. विदर्भातील पर्यटन स्थळाचा विकास होणार तरी कसा हाच मुख्य सवाल आहे.? संस्थांच्या प्रयत्नांमुळे शासनाने लक्ष दिले आहे. लढा तिव्र करावा लागेल.
- मो. सईद शेख, पर्यटन व इतिहास अभ्यासक, भंडारा

Web Title: Tourism development is only one percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.