बपेरात टुमदार शौचालयांची निर्मिती
By Admin | Updated: February 26, 2017 00:23 IST2017-02-26T00:23:53+5:302017-02-26T00:23:53+5:30
मध्यप्रदेश सिमेलगतच्या आणि बावनथडी नदीकाठावर वसलेल्या बपेरा गावाची ओळख ‘हागणदारी’ गाव अशी आहे.

बपेरात टुमदार शौचालयांची निर्मिती
ग्रामस्थांचा पुढाकार : ओडिएफमध्ये ५० शौचालयांची कामे पूर्ण
प्रशांत देसाई भंडारा
मध्यप्रदेश सिमेलगतच्या आणि बावनथडी नदीकाठावर वसलेल्या बपेरा गावाची ओळख ‘हागणदारी’ गाव अशी आहे. आता या गावाची अशी ओळख पुसल्या जाणार आहे. येथील ग्रामस्थांनी टुमदार सिमेंट काँक्रीटचे पक्के शौचालय बांधत असून जिल्हा स्वच्छता मिशनअंतर्गत (ओडीएफ) गावात शौचालयाचे कामे अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे हे गाव आता ‘हागणदारीमुक्त’ होणार आहे. बपेराची ही वाटचाल अन्य गावांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
तुमसर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या बपेरा हे गाव मध्यप्रदेशच्या सिमेलगत आहे. या गावाला शासकीय योजनांचा लाभ मिळतो, पण अनेकांना डावलण्यात येते अशा तक्रारींची शासकीय दफ्तरी नोंद आहे. दुर्लक्षित असलेल्या बपेरा गावाची लोकसंख्या २,६८५ एवढी असून या गावात ५२५ कुटुंब वास्तव्यास आहेत.
या गावातील अनेकांकडे शौचालये आहे. यातील अनेकजण शौचालयाचा वापर करीत असले तरी, त्यापेक्षा जास्त नागरिक उघड्यावरच शौचासाठी जातात. त्यामुळे या गावातील नागरिकांना घरी शौचालय बांधण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे पथक व तुमसर पंचायत समितीचे गटसंसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) च्या पथकाने मार्गदर्शन केले. उघड्यावर शौचास जाण्याने होणाऱ्या आजाराचे दुष्परीणाम ग्रामस्थांना पटवून सांगितले. त्यामुळे अनेकांनी घरी शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला. या गावातील ७४ कुटुंबांकडे शौचालय नसल्यामुळे त्यांनी उघड्यावर जाणे सुरूच ठेवले होते. या कुटुंबियांचे मनपरिवर्तन करून शौचालय उभारणीसाठी बाध्य केले.
बपेरा या गावात आता शौचालय उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून ७४ पैकी ४१ शौचालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित लोकांनी खड्डे करून शौचालयाचे बांधकाम सुरू केले आहे. बपेरा गावातील अनेक घरे कौलारू तर काही घरे स्लॅबची आहेत. यातील काहींकडे शौचालय नसल्याने त्यांनी आता शौचालय बांधकाम सुरू केले आहे. नवनिर्मित सर्व शौचालये स्लॅबची आहेत. शौचालयाला लागून बाथरूमचे बांधकाम करण्यात आले आहे. यात नळ फिटींग केले आहे. कौलारू घरासमोर आता बपेरात टुमदार स्लॅबचे शौचालय झाले आहे. बपेरा ग्रामवासीयांनी शौचालय बांधकाम करून उचलेले हे पाऊल विकासाकडे नेणारे आहे. सरपंच साधना वालदे, संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, समूह समन्वयक शशिकांत घोडीचोर, सचिव पटले, रोजगारसेवक उंदीरवाडे, योगराज धमगाये यांनी गावात शौचालय निर्मितीवर भर दिला.
तीन वर्षांची प्रतीक्षा संपेल तीन दिवसांत
मागील तीन वर्षांपासून बपेरा गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी मिशन कक्ष कार्यरत आहे. आता गावातील शौचालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान गावाला भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत शौचालय बांधकाम करण्याची गळ घालण्यात आली. यावेळी अनेकांनी या पथकाची टर उडविली. मात्र, पथकाने हार न मानता कार्य निरंतर सुरू ठेवले. याची फलश्रुती बपेरा गावात २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व शौचालयाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचा विश्वास पथकाने व्यक्त केला आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेला शौचालयाचा पाठपुरावा आता तीन दिवसात पूर्ण होणार आहे.
अशी झाली कामाची वाटचाल
बपेरातील अनेकांकडे शौचालय नसल्याने त्याचे बांधकाम करण्यासाठी मिशन कक्षाने गावात सभा लावली होती. यात त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अनेकांनी त्यांच्याकडे जागा व पैशाची अडचण असल्याचे सांगून हात वर केले. मात्र पथकाने कच न खाता वैयक्तिक शौचालय बांधकामावर भर दिला. गृहभेटीतून कुटुंबाशी संवाद साधून त्यांनी शौचालयाचे महत्व पटवून दिले. वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शनामुळे ग्रामस्थ प्रेरीत होऊन शौचालयाचे काम पूर्णत्वास नेले आहे.