कर्मचाऱ्यांचा आज लाक्षणिक संप

By Admin | Updated: September 14, 2016 00:36 IST2016-09-14T00:36:11+5:302016-09-14T00:36:11+5:30

पवनी पंचायत समिती अंतर्गत मांगली येथील ग्रामसेवक दत्ता जाधव यांना सभेदरम्यान नागरिकांनी मारहाण केली.

Today's figurative contact of employees | कर्मचाऱ्यांचा आज लाक्षणिक संप

कर्मचाऱ्यांचा आज लाक्षणिक संप

प्रकरण ग्रामसेवकाला मारहाणीचे : दोषींवर कारवाई करण्याची मागणी
भंडारा : पवनी पंचायत समिती अंतर्गत मांगली येथील ग्रामसेवक दत्ता जाधव यांना सभेदरम्यान नागरिकांनी मारहाण केली. सोबतच शासकीय दस्तावेज फाडले. याप्रकरणी पोलिसांनी दोषींवर कारवाई न करता त्यांना अभय दिले आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उद्या एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कर्मचारी सहभागी होत असल्याची माहिती कर्मचारी महासंघाचे गोपालराव कारेमोरे यांनी पत्रपरिषदेत दिली.
मांगली येथील ग्रामसेवक दत्ता जाधव यांना २९ आॅगस्टला गावातील गुंड प्रवृत्तीच्या नागरिकांनी मारहाण करून शासकीय दस्तावेज फाडले. याप्रकरणी अद्यापही पोलिसांनी दोषींवर कारवाई केली नसल्याने मागील १५ दिवसांपासून जिल्हाभरातील ग्रामसेवकांमध्ये असंतोष पसरला आहे. घटनेच्या दिवशी मांगली येथे तंटामुक्त समिती पुन:गठीत करण्याकरिता सभा बोलाविण्यात आली होती. दरम्यान गावातील एका गटाने यावर आक्षेप घेऊन ग्रामसेवक दत्ता जाधव व सरपंच यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. ऐवढ्यावरच हा जनक्षोभ न थांबता त्यांनी सभास्थळी असलेला चित्रीकरणाचा कॅमेरा पळविला तर ग्रामसेवक जाधव यांचा भ्रमणध्वनी फोडला. त्यासोबतच ध्वनीक्षेपक जाधव यांना फेकून मारले.
प्रकरण चिघळल्याने सरपंचांनी सभेतून काढता पाय घेतला. यानंतर जाधव यांना सभा दुसऱ्या ठिकाणी आयोजित करण्याचा दबाव आणून त्यांना दुसरीकडे नेण्यात आले. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता जाधव यांनी खंडविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. दरम्यान रात्री ग्रामसेवक व सरपंच यांनी याप्रकरणात पवनी पोलिसात तक्रार दाखल केली.
या गंभीर प्रकरणानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जावून साधा पंचनामा किंवा जाधव यांचे अद्याप बयाणही नोंदविले नाही. त्यामुळे याप्रकरणात दोषी असलेल्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप यावेळी कारेमोरे यांनी केला. उद्या संपात सहभागी होऊन प्रशासनाला याप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे निवेदन देण्यात येणार आहे. यानंतर कारवाई न झाल्यास सोमवारपासून जिल्ह्यात बेमुदत आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची माहिती अतुल वर्मा यांनी दिली. पत्रपरिषदेला कृती समन्वय समितीचे अध्यक्ष प्रभाकर कळंबे, केसरीलाल गायधने, सतीश मारबते, अतुल वर्मा, एस.टी. भाजीपाले, विलास खोब्रागडे, शामराव नागदेवे, नूतन बिसेन, आर.एस. पाटील, शाम गिलोरे, सुधाकर चिंधालोरे, दत्ता जाधव आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

यात दोषी कोण?
ग्रामसेवक जाधव यांनी दोन पोलिसांचा बंदोबस्त मागितला होता. संतप्त नागरिकांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. याची माहिती जाधव यांनी खंडविकास अधिकारी यांना दिली. मात्र त्यांनीही सहकार्य केले नसल्याचा रोष यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी व प्रकरणातील दोषींवर कारवाई न करणारे पोलीस अधिकारी हे दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

तंमुसची सभा घेणार नसल्याचा संघटनेचा इशारा
तंटामुक्त समिती ही गृह विभागाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे त्या समितीची नियुक्ती करण्याची जबाबदारी गृहविभागाची आहे. मात्र ग्रामीण विकासाशी जुळून असलेल्या ग्रामविकास विभागाच्या ग्रामसेवकावर समिती गठीत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या समितीत दंगे निर्माण होतात. त्यामुळे असा प्रकार टाळावा यासाठी यानंतर जिल्ह्यात कुठल्याच ग्रामपंचायतीत तंटामुक्त समितीची सभा घेणार नसल्याचा निर्णय जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने घेतल्याची माहिती यावेळी दिली.
जाधव कुटुंब धास्तावले
ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामसेवक जाधव यांना मांगली येथे मारहाण करण्यात आली. त्यामुळे स्वत: जाधव व त्यांचे कुटुंबिय या प्रकरणामुळे धास्तावले आहेत. पोलीस दोषींना पाठीशी घालत आहे. त्यामुळे पत्नी, मुलांसह स्वत: ते धास्तावल्याची माहिती दत्ता जाधव यांनी पत्रपरिषदेत दिली.

कामबंंद आंदोलन
जाधव यांना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदविताना ग्रामसेवक संघटनेने जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी, अशी त्यांची एकमुखी मागणी आहे. मात्र पोलीस प्रशासनाने अद्यापही दोषींवर कारवाई केली नाही. त्यामुळे उद्या एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपात जिल्हा परिषद व सातही पंचायत समितीचे सर्व कर्मचारी सहभागी होत आहेत.

Web Title: Today's figurative contact of employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.