महासमाधिभूमी परिसरात उसळणार आज लाखोंचा जनसागर
By Admin | Updated: February 8, 2016 00:37 IST2016-02-08T00:37:30+5:302016-02-08T00:37:30+5:30
पत्र्त्रामेत्ता संघ द्वारा निर्मित ऐतिहासीक, प्राचीन बुध्दनगरी पवनीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावरील भारतातील सर्वात मोठ्या, ...

महासमाधिभूमी परिसरात उसळणार आज लाखोंचा जनसागर
विदेशातील बौद्ध भिक्खूंचीही उपस्थिती
नववा वर्धापन दिन
पवनी : पत्र्त्रामेत्ता संघ द्वारा निर्मित ऐतिहासीक, प्राचीन बुध्दनगरी पवनीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावरील भारतातील सर्वात मोठ्या, भारत-जपानच्या मैत्रीचे प्रतीक ठरेल्या रुयाड (सिंदपुरी) येथील महासमाधीभुमी महास्तुपाला ९ वर्ष पुर्ण होत आहेत. त्या निमित्ताने येथे आज ८ फेब्रुवारीला धम्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या धम्मोत्सवात सहभागी होण्याकरिता देश विदेशातील बौध्द भिक्कु येणार असुन लाखोंचा जनसागर उसळणार आहे.
धम्मदुत भदंत संघरत्न मानके यांच्या अथक प्रयत्नाने महासमाधी भुमि महास्तुपाची निर्मिती करण्यात आली आहे. हा महास्तुप भारताच्या स्थापत्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण ठरला आहे. ऐतिहासिक प्राचीन पवनी नगरी पुर्वी बुध्द धर्माच्या प्रसाराचे मुख्य केंद्र होती. येथे सम्राट अशोकाच्या काळातील भारतातील सर्वात मोठा बौध्द महास्तुप सापडला आहे. येथे आजही बुध्दकालीन अवशेष सापडतात. पण काळाच्या ओघात येथील बुध्द धर्माचे प्रसार केदं्रही बंद झाले. ऐतीहासिक पवनी नगरीला आपली प्राचीन सांस्कृतिक प्रतीष्ठा परत मिळवुन देण्याच्या उद्देशाने भदंत संघरत्न मानके यांच्या दुरदृष्टीतून २९ वर्षाअगोदर रुयाड येथे भारतातील सर्वात मोठा, आंतरराष्ट्रीय स्तराचा महास्तुप निर्माण करण्याचे ठरविले गेले. हा निर्णय बौध्द धर्माच्या दृष्टीने पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरला आहे.
या महास्तुपाची शिल्पशैली ही जपानच्या परंपरागत स्तुप शैलीवर आधारित आहे. या स्तुपाचे वास्तुशिल्प जपानचे प्रख्यात वास्तुशिल्प तज्ज्ञ नाकामुरा व ओकाजीमा यांनी तयार केले आहे. या महास्तुपाची वास्तू जपानी पैगोडा शिल्पशैलीत आहे. ही वास्तु आकाशत उंच उडणाऱ्या राजहंस पक्षाप्रमाणे दिसते. १० हजार चौरस फुट जागेत १२० फुट उंचीवर ही वास्तु तयार करण्यात आली. या स्तुपाच्या निर्मितीला सुरवातीला अडचणी आल्या. पण भारतीय वास्तुतज्ञांनी जपानी तज्ज्ञांकडून बारकावे समजून घेवुन या स्तुपाची निर्मिती केली.
या महास्तुपात स्थापित केलेल्या प्रतमांना महत्वपुर्ण इतिहास आहे. तथागत सम्यक संबुध्दाची १५० फुट उंच प्रतीमा स्थापीत करण्याकरिता, वाराणसी पासुन ४० किलोमीटर अंतरावरील चुनारगड येथून दगड आणला गेला. या दगडापासून सम्राट अशोकाने २ हजार ३०० वर्षापूर्वी ८४ हजार स्तुपाची निर्मिती केली. या दगडाचा उपयोग या महास्तुपातील बुध्द प्रतीमा तयार करण्याकरिता करण्यात आला.
ही प्रतिमा बनविणारे ही त्याच वंशाचे आहेत. या स्तुपात एकाचवेळी दोन हजार उपासक ध्यान साधनेसाठी बसू शकतात.
हा महास्तुप पवनी तालुक्याच्या पर्यटन विकासात महत्वपुर्ण ठरलेला आहे. या स्तुपामुळे पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. या महास्तुपात दररोज मोठ्या संख्येने देश विदेशातील पर्यटक, बौध्द उपासक येत आहेत. हा महास्तुप आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनण्याच्या उंबरठ्यावर आहे.
या पार्श्वभूमीवर आज भव्य धम्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन अ.भा. भिक्कू संघाचे संघनायक भदंत सदानंद महास्थवीर यांच्या हस्ते भदंत संघरत्न मानके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या मध्ये लाखोंचा जनसागर उसळणार आहे. (शहर प्रतिनिधी)