टिप्पर चालकाची अरेरावी; वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 00:52 IST2017-05-19T00:52:33+5:302017-05-19T00:52:33+5:30
विरूद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परला साइड देऊनही टिप्परचालकाने सुमोचालकाशी अरेरावी केल्यामुळे संतप्त सुमोचालक

टिप्पर चालकाची अरेरावी; वाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली बु. : विरूद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परला साइड देऊनही टिप्परचालकाने सुमोचालकाशी अरेरावी केल्यामुळे संतप्त सुमोचालक आणि प्रवाशांनी सदर टिप्पर अडविला. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालक आणि गावकऱ्यांचे या सुमोचालकाला पाठबळ मिळाल्याने सुमारे तीन तास विरली बु ते इटान मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना बुधवारला रात्री साडेसातच्या सुमारास या मार्गावर विरली जवळ घडली. लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक पूर्ववत सुरू केली.
परिसरात बीएसएनएलच्या अंडरग्राऊंड लाईनचे काम सुरू आहे. या खोदकामाची माती विरली -इटान मार्गावर रस्त्याच्या कडेला टाकली आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी ठिकठिकाणी गिट्टीचे ढिग रस्त्याच्या दुसऱ्या कडेला टाकलेले आहेत. घटनेच्या वेळी इटान रेतीघाटावरून ओव्हरलोड रेती भरून येणाऱ्या टिप्पर क्रमांक एमएच ४० एके ६५५७ विरली बु. कडून जाणाऱ्या पाटुरू कंपनीच्या एमएच १४ डीटी ३५० क्रमांकाच्या टाटा सुमोचालक शरद मेश्राम यांनी साइड दिली. मात्र, टिप्परचालकाने सुमोसमोर असलेल्या गिट्टीच्या ढिगावरून ने असे सुमोचालकाला दरडावले. त्यामुळे संतप्त झालेल्या सुमोचालक आणि गाडीत असलेल्या पाटुरू कंपनीच्या कार्यकर्त्यांनी टिप्पर अडविला. याचवेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालक आणि गावकऱ्यांच्या समर्थनामुळे वाहतुक ठप्प झाली. सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाल्याने इटान रेतीघाटावरून ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या दहा-बारा टिप्परची रीघ लागली होती. याप्रसंगी संतप्त गावकऱ्यांनी टिप्परच्या काचा फोडल्या.
घटनेची माहिती मिळताच लाखांदुरचे प्रभारी ठाणेदार चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राखडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. लाखांदूर पोलिसांनी दोन्ही बाजुंची समजूत घालून रस्ता मोकळा करून वाहतुक पूर्ववत सुरू केली.
याप्रसंगी संतप्त गावकऱ्यांनी ओव्हरलोड रेती भरलेले सुमारे दहा-बारा टिप्पर अडविले. मात्र रात्री १० ला वाहतूक सुरू होईपर्यंत महसूल विभागाचा कोणताही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नाही. हे सर्व टिप्पर ओव्हरलोड आणि विनारॉयल्टी रेतीवाहतूक करीत असल्याचे समजते. टिप्परच्या कारवाईपोटी सुमारे ६ लाख रूपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला असता यासंबंधी प्रभारी तहसीलदार कावळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संंबंधित राजस्व निरीक्षक आणि तलाठ्यांना सुचना दिल्याचे सांगितले.