१० कोटी रुपयांचे ऊसाचे चुकारे थकीत
By Admin | Updated: June 11, 2015 00:27 IST2015-06-11T00:27:34+5:302015-06-11T00:27:34+5:30
एकीकडे धानाचे भाव पडले, महागाई वाढली, शेतातील उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसताना..

१० कोटी रुपयांचे ऊसाचे चुकारे थकीत
मार्चपासून वेतन ठप्प : कारभार वैनगंगा साखर कारखान्याचा
करडी (पालोरा) : एकीकडे धानाचे भाव पडले, महागाई वाढली, शेतातील उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसताना शेतकऱ्यांना ऊसाच्या नगदी चुकाऱ्यांचा आधार वाटत होता. मात्र वैनगंगा शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे १० कोटींचे चुकारे जानेवारीपासून थकीत ठेवले आहेत. मार्च महिन्यापासून कामगारांना वेतन मिळालेले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
शासनाच्या जाहीर हमी भावापेक्षा कमी दरात ऊसाची खरेदी केली जात असतांनाही शेतकऱ्यांची कुरबुर नाही. कामगारांना कमी वेतन दिले जात असतानाही त्यांच्या तक्रारी नाहीत. मात्र एवढे सहन करुनही ऊसाचे वेळेवर चुकारे मिळत नसतील, कर्मचाऱ्यांना नियमित मिळत नसेल तर न्याय मागायचा कुणाकडे? असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. दि.३१ मार्चपर्यंत ऊसाचे चुकारे देण्याचे आश्वासान कारखाना प्रशासनाने दिले होते. मात्र मार्च, एप्रिल, मे महिना संपून जून महिना सुरु झालेला असताना चुकाऱ्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही. कारखान्यातील २०० च्यावर कामगारांना मार्च २०१५ पासून वेतन मिळालेले नाही. परिणामी, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र सांगायचे कुणाला, तक्रार करणाऱ्याला कामावर ठेवले जाईल, याची शाश्वती नसल्यामुळे कुणीही बंड पुकारायला तयार नाहीत. चुकारे आज देऊ, उद्या देऊ या पलिकडे सांगायला तयार नाहीत. त्यामुळे ऊसाचे चुकारे अडचणीत सापडले असून कामगारांच्या वेतनाचा प्रश्न वेळीच सुटण्याची शक्यता धूसर झाली आहे. (वार्ताहर)
कर्मचारी कपात मोहीम
ऊसाची लागवड वाढावी यासाठी कारखान्याने बीटनिहाय कार्यालय व कृषी सहाय्यक नेमले होते. मात्र वेळेवर चुकारे मिळत नसल्याने ऊसाची लागवड शेतकऱ्यांनी कमी केली. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र घटले. कारखान्याने ऊसाचे क्षेत्र कमी झाल्याचे कारण सांगत कृषी कर्मचारी कपातीचे धोरण अंगिकारले आहे. त्यामुळे तरुणांवर बेरोजगार होण्याचे संकट ओढवले आहे. कारखान्याने २० ते २५ कृषी सहाय्यकांना कमी केले असले तरी कारखाना प्रशासन १० ते १२ कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचे सांगत आहे.
साखरेचे उत्पादन सर्वत्र वाढल्यामुळे साखरेचे दर घसरले आहेत. साखरेची निर्यात करताना अडचणी येत आहेत. बँकांकडूनही पाहिजे त्या प्रमाणात पैसा उपलब्ध होत नसल्यामुळे ऊसाचे चुकारे व कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी लवकरच निर्णय होईल. शेतकऱ्यांचा एक रुपयाही ठेवला जाणार नाही. पुढील वर्षात दोन टप्प्यात वेतन देण्याच्या दिशेने विचार सुरु आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा दिले जाईल. जिथे कामे नव्हते तेथील १०-१२ कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले. आवश्यक तिथे गुणवत्तेनुसार भरती केली जाईल.
- दादा टिचकुले
उपाध्यक्ष, वैनगंगा शुगर अँड पावर कारखाना देव्हाडा.