सिहोरा परिसरात वाघांची दहशत
By Admin | Updated: December 22, 2016 00:47 IST2016-12-22T00:47:30+5:302016-12-22T00:47:30+5:30
सातपुडा पर्वतरांगांच्या जंगल शेजारी असणाऱ्या गावात वाघाने गाई ठार केल्या आहेत.

सिहोरा परिसरात वाघांची दहशत
गावाशेजारी वाघांचे दर्शन : सायंकाळ होताच गावकऱ्यांत भीती
चुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वतरांगांच्या जंगल शेजारी असणाऱ्या गावात वाघाने गाई ठार केल्या आहेत. या वाघांचे दर्शन परिसरातील अन्य गावात होत आहेत. यामुळे सायंकाळ होताच घराबाहेर पडणे नागरिकांचे कठिण झाले आहे. या परिसराची अवस्था व्याघ्र प्रकल्पासारखी झाली आहे.
ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ व सातपुडा पर्वत रांगांच्या घनदाट व राखीव जंगलात वाघांची हजेरी परिसरात चर्चेचा विषय झाली आहे. जंगलाशेजारी असणाऱ्या सोंड्या, मुरली, सोनेगाव गावाच्या हद्दीत वाघाने गाई व बैल ठार केले आहे. दरम्यान या वाघाचे दर्शन गावकऱ्यांना गाव शेजारी होत असल्याने वाघांच्या संख्येत वाढ झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चांदपूरच्या जंगलात वाघांनी बस्तान मांडल्याने परिसरातील नागरिकांत चर्चा सुरु झाल्या आहेत. जंगलात नागरिकांनी फेरफटका मारणे बंद केले आहे. टेमनी शिवारात शेतकऱ्यांना वाघ दिसून आल्यानंतर पिपरी चुन्ही, वाहनी, मांडवी गावाच्या शिवारात वाघांचे दर्शन नागरिकांना झाले आहे. यामुळे शेतशिवारात ये जा करण्यास शेतकरी दहशतीत आहेत. या गावाशेजारी वाघाने जनावरांना ठार केले आहे.
संपूर्ण परिसर व्याघ्र प्रकल्पासारखी अवस्था असल्याचे दिसून येत आहे. गावागावात वाघ दिसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान दावेझरी शिवारात वाघाने रापनी बसला मार्गावरच रोखले होते. अशी माहिती दावेझरीच्या सरपंच गायत्री चौरागडे यांनी दिली. वाहनी शिवारात वाघ आढळल्याची माहिती पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र ढबाले यांनी दिली. वन विभागाच्या यंत्रणेने अलर्ट राहण्याची गरज आहे. काही दिवसात ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाला इको टुरीझम मध्ये विकास घडून येणार आहे. यामुळे पर्यटनस्थळात वाघ व अन्य वन्य प्राण्यांचे दर्शन पर्यटकांना सोने पे सुहागा ठरणार आहे. वन विभागाचे रिक्त जागा भरण्याची गरज आहे. दरम्यान पर्यटनस्थळाचा घनदाट जंगल सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेपर्यंत विस्तारीत आहे.
याच धरणाचा मार्ग मध्यप्रदेश राज्याला जोडण्यात आला आहे. शिकाऱ्यासाठी हा मार्ग उपयुक्त आहे. याच मार्गाचा अवैध व्यवसायीक उपयोग करीत आहेत. वन विभागाच्या नियंत्रणात मार्ग नाही. याच मार्गावरून वाहनांची रेलचेल वाढल्याने संशय बळावला आहे. आंतरराज्यीय सीमेवर पोलिसांची चौकी व वन विभागाची तपासणी आहे. यामुळे राज्य मार्गावरून वाहनांची वर्दळ मंदावली आहे. अवैध व्यावसायि पळवाट शोधत असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. दरम्यान यासंदर्भात बपेराचे परिक्षेत्राधिकारी सी.एस. कामथे यांच्या संपर्क साधला असता होऊ शकला नाही. (वार्ताहर)