गारपिटीसह वादळाचा तडाखा

By Admin | Updated: June 2, 2015 00:35 IST2015-06-02T00:35:32+5:302015-06-02T00:35:32+5:30

रविवारला रात्री अचानक वादळ वारांसह गारपिट झाली. यात जीवीतहानी झाली नसून धानपिक व कवेलूंच्या घराचे ....

Thunderstorms with hail | गारपिटीसह वादळाचा तडाखा

गारपिटीसह वादळाचा तडाखा

धानपिकासह कौलारू घरांचे मोठे नुकसान
वातावरणात गारवा, जीवित हानी टळली, वृक्ष कोलमडले, विद्युत खांबासह टिनाचे पत्रे पडले
लाखांदूर : रविवारला रात्री अचानक वादळ वारांसह गारपिट झाली. यात जीवीतहानी झाली नसून धानपिक व कवेलूंच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विद्युत तारा व खांब तुटल्याने विद्युत विभागाचे मोठे नुकसान झाले. सध्या विद्युत पुरवठा रात्री पासून बंद असून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्याने लाखांदूर वडसा मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
दिवसभर उन्हाचा तडाखा व रात्री अचानक जोरदार वादळी वारा व गारपीटीचा तडाखा बसल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी कवेलूंच्या घरात राहणाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरला आहे. उन्हाळी धानपिकाची कापणी व मळणी सुरु असताना पावसामुळे व गारपिटीमुळे तोंडावर आलेले धानपिक निसर्गाने हिसकावले. विक्रीसाठी आधारभूत धान खरेदी केंद्र व बाजार समितीच्या परिसरात ठेवलेले हजारो हेक्टर धान्य पाण्यात भिजले. धानाला योग्य भाव नाही. उलट पाण्यात भिजले यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला. कडप्पा पावसात भिजल्याने शेतकरी परिवारासोबत जीवाचे रान करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. वादळाचा सर्वात जास्त फटका लाखांदूर, अंतरगाव, चिचोली, दांडेगाव, कोच्छी, मांढळ, भागडी, परसोडी, आथली, आसोला, कुडेगाव, मांदेड, पाहुणगाव, डोकेसरांडी, ओपारा सरांडी बु., ढोलसर तथा सभोवतालच्या परिसरात जास्त बसला. लाखांदूर येथील फुटपाथवर असलेल्या पानटपऱ्या, भोजनालय भाजीपाला दुकाने पुर्णत: वादळाने उध्वस्त झाले. कवेलूंच्या घरांचे कवेलू उडाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले. मंगल कार्यालये, दुकानांचे टिनपत्रे उडाल्याने अतोनात नुकसान झाले. सर्वात जास्त फटका रस्त्यालगतची झाडे, कार्यालयातील झाडे, फळांची झाडे, आंब्याच्या झाडांचे शेतकऱ्यांचे मोठे नुकसानझाले. आसोला, आथली, भागडी, कोच्छी या गावातील भाजीपाला पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
वादळाला सुरुवात होताच अनेक गावातील विद्युत खांब पडले, तारा तुटल्या यामुळे रात्री ११ वाजतापासून विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद आहे. सकाळपासून विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी कमालीचे प्रयत्न करीत आहेत. झाडांमुळे विद्युत तारा तुटल्याने झाडे तोडण्याचा सपाटा विद्युत विभागाने सुरु केला आहे. येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयांनी अनेक वर्षापासूनचे मोठे झाडे तुटल्याने गावकऱ्यांनी पहाटेच त्याकडे नेण्यासाठीझुंबड केली. तर चिचोली लाखांदूर सोनी मार्गावर अनेक झाडे रस्त्यावर पडल्याने तसेच विद्युत तारा रस्त्यावर लोंबकळत असल्याने रात्रभर वाहतुकीची कोंढी निर्माण झाली होती.
वादळी वारा व गारपिटीच्या तडाख्याचा तसेच नुकसानीची तिव्रता बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नरेश चुन्ने तसेच काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोहर महावाडे, सदाराम दिघोरे, ताराचंद मातेरे, मनोहर राऊत, गोपाल मेंढे, मागास सेलचे जिल्हा अध्यक्ष (राकाँ) चंद्रशेखर टेंभुर्णे, जितेंद्र पारधी, रामचंद्र परशुरामकर, ओमप्रकाश सोनटक्के, धनराज ढोरे, वामन मिसार यांनी पक्षाच्या वतीने तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ आर्थिक मदत व ताडपत्रीचे वाटप करण्याची मागणी केली.

घरांची पडझळ
खरबी (नाका) : भंडारा तालुका अंतर्गत येणाऱ्या खराडी गावामध्ये काल रात्री १० वाजता अचानक वादळाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. यात अनेकांना नुकसान सहन करावे लागले. घराचे छत उडाले तर काही ठिकाणचे विद्युत पोल मोडले व साईबाबा राईस मिल खराडी येथील राईस मिलचे टिनाचे छत उडाल्यामुळे धान पाण्यात खराब झाले व त्यामुळे १ लाख २५ हजाराचे नुकसान झाले आहेत. नुकसान झालेल्यामध्ये कवळू मुरकुटे, केशव हिवसे, आसाराम मुरकुटे, युवराज मुरकुटे, दिपांकर बांगर, इंद्रजित बांगर आदींचे नुकसान झाले. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)

मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
पालांदूर : असह्य उकाड्याने हैराण असताना काल मध्यरात्री जोरदार पूर्व पश्चिम वाऱ्यासह पालांदूर परिसरात वीस मिनिटे पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा झाला असून उन्हाच्या काहिलीपासून जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे.
आसगाव पालांदूर वीज वाहिनीवर झाडे कोसळल्याने पालांदूर परिसर रात्रभर अंधारात होता. सकाळी ढगांनी आकाश आच्छादले होते. वातावरण एकदम प्रसन्न व आल्हाददायक वाटले. मान्सूनपूर्व संधेला आलेल्या पावसाने शेतकरी शेतजमीनीच्या मशागतीच्या कामाला जोमाने लागणार आहे. येत्या हप्त्याभरात विभषीत मान्सून डेरेदाखल होणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे या पावसाला महत्व देत शेतकरी कामाला लागला आहे.रोहिणी पावसाचा नक्षत्र सुरु आहे. रोहिण्या अपेक्षित बरसल्या तर शेती व्यवसायाला त्याचा लाभ होऊन बागायत मालात वाढ व दर्जात सुधारणा होणार व ६ जून पासून खरीपाचे पऱ्हे टाकणीला आरंभ होणार.

चक्रीवादळ व गारपिटीचा तडाखा संपूर्ण तालुक्याला बसला. धानपिक कापणी व मळणीची ही वेळ असल्याने यावेळी सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. लगेच कृषी सहाय्यकांना तोंडी सूचना देवून प्राथमिक नुकसानीची माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु शासनस्तरावरून जोपर्यंत सर्व्हेक्षणाचे आदेश येत नाही तोपर्यंत सखोल सर्व्हेक्षण होणार नाही.
- निलेश गेडाम
तालुका कृषी अधिकारी लाखांदूर

Web Title: Thunderstorms with hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.