थुल यांनी घेतला दावेझरी हत्याकांडाचा आढावा
By Admin | Updated: September 2, 2016 00:33 IST2016-09-02T00:33:28+5:302016-09-02T00:33:28+5:30
तुमसर तालुक्यातील दावेझरी येथे जादुटोणा केल्याच्या संशयावरून ढोक दाम्पत्यांची काही लोकांनी निर्घृण हत्या केली होती.

थुल यांनी घेतला दावेझरी हत्याकांडाचा आढावा
मृताच्या मुलांशी केली बातचीत : अधिकाऱ्यांना दिले निर्देश
भंडारा : तुमसर तालुक्यातील दावेझरी येथे जादुटोणा केल्याच्या संशयावरून ढोक दाम्पत्यांची काही लोकांनी निर्घृण हत्या केली होती. घटनेची माहिती होताच अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश सी. एल. थुल यांनी आज गुरूवारला दावेझरीचा दौरा करून घटनेचा आढावा घेतला.
थुल यांनी यावेळी मृतक ढोक दाम्पत्याच्या कुटुंबांशी चर्चा केली. त्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचा आणि पीडित कुटुंबांचे पुनवर्सन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दावेझरी येथील दौऱ्यानंतर थुल यांनी आपला अहवाल अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे सोपविणार आहेत. थुल यांनी गुरुवारला दावेझरी येथे पीडित कुटुंबाच्या घराची पाहणी केली. त्यावेळी या घरात कुणीही नव्हते. यावेळी त्यांनी गावातील नागरिकांशी चर्चा केली. या दौऱ्यात त्यांनी तुमसरात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात मृतकाचे दोन्ही मुले उपस्थित होते. त्यापूर्वी थुल यांनी पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्याकडून या घटनेची माहिती जाणून घेतली. यासोबतच ग्रामीण भागात अंधश्रद्धेतून घडणाऱ्या घटनांविषयी चिंता व्यक्त केली.
दौऱ्या दरम्यान, पीडित कुटुंबाकडे जातीसंबंधीचे प्रमाणपत्र नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांना मृतकाच्या दोन्ही मुलांचे नावे जाती प्रमाणपत्र तातडीने देण्याचे निर्देश दिले. पोलीस प्रशासनाला या घटनेचा खटला जलदगती न्यायालयात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व जमीनीचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
दावेझरी येथे जादुटोणाच्या संशयावररून २७ आॅगस्टच्या मध्यरात्री यादवराव ढोक (६५) आणि कौशल ढोक (५५) यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी १६ आरोपिना अटक केली आहे. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक विनीता साहू, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवसुदन धारगावे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)