लघु पाटबंधारे विभागाचे तीन उपविभाग बंद
By Admin | Updated: July 17, 2016 00:21 IST2016-07-17T00:21:05+5:302016-07-17T00:21:05+5:30
भंडारा तलावांचा जिल्हा म्हणून शासनदप्तरी नोंद आहे. तलावांच्या देखरेखीकरिता राज्य शासनाने तुमसर, मोहाडी व लाखांदूर तालुक्याकरिता स्वतंत्र उपविभाग सुरू करण्याचे आदेश दिले होते.

लघु पाटबंधारे विभागाचे तीन उपविभाग बंद
जलयुक्त शिवार योजनेवर प्रश्नचिन्ह : तुमसर, मोहाडी, लाखांदूरचा समावेश
मोहन भोयर तुमसर
भंडारा तलावांचा जिल्हा म्हणून शासनदप्तरी नोंद आहे. तलावांच्या देखरेखीकरिता राज्य शासनाने तुमसर, मोहाडी व लाखांदूर तालुक्याकरिता स्वतंत्र उपविभाग सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. परिणामी जलयुक्त शिवार व मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन कार्यक्रमांना खीळ बसली आहे.
लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद, भंडारा येथे राज्य शासनाने तुमसर, मोहाडी व लाखांदूर येथे तीन स्वतंत्र उपविभाग सुरू करण्याचे आदेश सहा ते सात वर्षांपुर्वी दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही. राज्य शासन जलयुक्त शिवार व मालगुजारी तलाव पुनरूज्जीवनाला उपविभागाअभावी खीळ बसली आहे. भंडारा जिल्ह्यातच मामा तलाव आहेत. भंडारा जिल्ह्यात १,१५४ मामा तलाव आहे. एका शाखा अभियंत्यावर तीन तीन तालुक्यांचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे प्रभावी, योग्यरित्या नियोजन करता येणे शक्य नाही.
तुमसर तालुक्यासह इतर तालुक्यात पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. तलाव अजून रिकामेच आहे. अनेक वर्षापासून मामा तलाव गाळाने भरले आहेत. देखभाल, दुरूस्ती करण्यात आले नाही. यामुळे या हंगामात हे तलाव सिंचन करण्यास असमर्थ ठरणार आहेत. कोळी बांधवांची मत्स्य शेती धोक्यात आली आहे. येथे जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. विभाग मंजुरीकरिता कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येतो. हे उपविभाग मराठवाड्यात जाण्याची शक्यता असून याकरिता हालचाली सुरू आहेत. सात वर्षापुर्वी मंजूर झालेले उपविभाग का सुरू झाले नाही हा संशोधनाचा विषय आहे. याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष कारणीभूत आहे. प्रत्येक तालुक्यात मामा तलावांची मोठी संख्या आहे. राज्यात इतकी तलावांची संख्या कुठेही नाही. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे महत्वपूर्ण तलाव शेवटची घटका मोजत आहेत. शेतकरी व मत्स्यशेती करणाऱ्याकरिता संजिवनी ठरणारे तलावांना येथे घरघर लागली आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नवीन तलव, बोळी, साठवण तलाव, मामा तलावांचे पुनरूज्जीवन करणे हेही एक शासनाचे मिशन आहे, परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
लघु पाटबंधारे विभाग अंतर्गत तुमसर, मोहाडी, लाखांदूर येथे उपविभागांना सहा ते सात वर्षापुर्वी मंजुरी देण्यात आली. हे उपविभाग सुरू करण्याकरिता भंडारा जिल्हा परिषदेने जलसंपदा विभागाकडे पत्र पाठविले आहे. जिल्हा परिषदेकडे उपविभागाकरिता कर्मचारी उपलब्ध असल्याचा अहवाल सादर केला आहे.
-पी.एस. पराते, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग जि.प. भंडारा.
मामा तलावांच्या दुर्लक्षामुळे शेतीला सिंचन होणार नाही, मत्स्यशेती बुडण्याची भीती निर्माण झाली आहे.
-संजय केवट, संचालक, राष्ट्रीय मत्स्यजिवी सहकारी संघ, नवी दिल्ली.