आणखी तीन आरोपींना अटक
By Admin | Updated: December 5, 2015 00:44 IST2015-12-05T00:44:05+5:302015-12-05T00:44:05+5:30
कोका अभयारण्यातून लाकूड तस्करी करताना भरारी पथकाने सापळा रचून वाहनासह पाच आरोपींना पकडले होते. यावेळी बाळकृष्ण कामथे हा आरोपी फरार झाला होता.

आणखी तीन आरोपींना अटक
प्रकरण लाकूड तस्करीचे : आरोपींची संख्या आठ, दोघांची तुरूंगात रवानगी
करडी (पालोरा) : कोका अभयारण्यातून लाकूड तस्करी करताना भरारी पथकाने सापळा रचून वाहनासह पाच आरोपींना पकडले होते. यावेळी बाळकृष्ण कामथे हा आरोपी फरार झाला होता. त्याला २९ नोव्हेंबर रोजी तर यापूर्वी चोरीची लाकडे घेणाऱ्या भंडारा शहरातील प्रविण घोलप, तुळशीराम घोलप या आरोपींना १ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघांची ११ डिसेंबरपर्यंत तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता आठ झाली आहे.
कोका अभयारण्यातील सालेहेटी बीट क्र. १६४ मधून लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती कोका अभयारण्यातील भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून वाहन क्र. एम एच ३२ क्यू ३२९६ हे वाहन पकडले. यात लाकडे आढळून आली होती. या लाकडांची किंमत ५,५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. या वाहनातील सहा जणांची विचारपुस केली असता त्यांनी सदर लाकडे चोरीची असून सालेहेटीतून नेत असल्याचे सांगितले. यावरुन भरारी पथकाने वाहन चालक प्रशांत मोहतुरे, सुखदेव मेश्राम, अंकुश मोहनकर, हरिश्चंद्र लुटे, विलास रेहपाडे यांना अटक केली होती. बाळकृष्ण कामथे रा.माटोरा हा आरोपी घटनास्थळाहून पसार होण्यात यशस्वी झाला होता. त्याला २९ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. या आरोपींकडून यापूर्वी तस्करीची लाकडे विकत घेणारे प्रविण घोलप, तुळशीराम घोलप रा. भंडारा यांना अटक करण्यात आली.
सदर कारवाई भरारी पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी शेडगे, देवंद्र कुंभारे यांच्या मार्गदर्शनात सहायक वनपरिक्षेत्राधिकारी डी. एस. मारबते, जे. के. ढाले, सुरेश गोखले, वनरक्षक जी. एन. नागरगोचे, बी. एस. कदम, डी. एस. कौरकर, जे. एस. गणवीर, रामचंद्र उके, प्रकाश कुळमथे, अतुल शिंगाडे यांनी केली.
भंडारा शहरातून अटक केलेल्या दोन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता या दोन्ही आरोपींना ११ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात गुंतलेल्या आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. (वार्ताहर)