तीन सदस्यीय चौकशी समिती गठित
By Admin | Updated: February 26, 2017 00:27 IST2017-02-26T00:27:15+5:302017-02-26T00:27:15+5:30
आपातकालीन स्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केलेल्या महिलेवर उपचार करण्यात हयगय केल्याप्रकरणी ...

तीन सदस्यीय चौकशी समिती गठित
प्रकरण जखमीच्या उपचारात हयगयीचे
भंडारा : आपातकालीन स्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केलेल्या महिलेवर उपचार करण्यात हयगय केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रवी धकाते यांनी त्रिसदस्यीय चौकशी समितीचे गठित करून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. दरम्यान, रूग्णांच्या उपचारात हयगय खपवून घेतली जाणार नसून दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले.
शुक्रवारला सकाळी बेलानजिक झालेल्या अपघातात प्रा. मुकेश रहांगडाले यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी रिंकू रहांगडाले गंभीररित्या जखमी झाली. त्यानंतर त्यांना सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु त्यावेळी कार्यरत डॉक्टरांनी त्यात गांभीर्य न दाखवता उपचारासाठी विलंब केला. नातेवाईकांकडून याची माहिती होताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत लांजेवार हे रूग्णालयात जावून डॉक्टरांना घेरल्यानंतर उपचार सुरू करण्यात आले. अडीच तासानंतर त्यांना दाखल करून घेण्यात आले. रिंकू रहांगडाले यांची प्रकृती अद्यापही अस्वस्थ आहे.
घटनास्थळी असलेले प्रशांत लांजेवार म्हणाले, रिंकू रहांगडाले यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रूग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. नातेवाईकांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना डॉक्टरांना बोलाविण्यासाठी सांगूनही डॉक्टर आले नव्हते. त्यापूर्वी खासगी रूग्णालयात २० टाके लावण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आ.चरण वाघमारे व प्रशांत लांजेवार यांनी शनिवारला जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. रवि धकाते यांची भेट घेतली. या चर्चेत तीन सदस्यीय समिती गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. या चौकशी समितीत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनीता बढे, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. पियुष जक्कल व निवासी आरोग्य अधिकारी डॉ.किशोर चाचेरकर यांचा समावेश आहे. दोन दिवसात चौकशी करून या समितीला अहवाल देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)