तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूने लाखांदुरात शोककळा
By Admin | Updated: October 25, 2014 22:35 IST2014-10-25T22:35:21+5:302014-10-25T22:35:21+5:30
महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केल्यानंतर दोन चाकी रेसींग बाईक हाताखाली असावी, अशी प्रत्येकच तरुणांची इच्छा असते. परिस्थिती नसतानाही पालक मुलांची हौस भागवित असले तरी आपल्या

तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूने लाखांदुरात शोककळा
लाखांदूर : महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केल्यानंतर दोन चाकी रेसींग बाईक हाताखाली असावी, अशी प्रत्येकच तरुणांची इच्छा असते. परिस्थिती नसतानाही पालक मुलांची हौस भागवित असले तरी आपल्या पाल्याकडून वाहनाचा गैरवापर होत तर नाही ना? याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. जीवाची पर्वा न करता भरधाव वाहने चालविण्याची पैज लावतात आणि जीव गमावतात. लाखांदूर येथील तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूने पालकांनाच सजग होण्याची वेळ आली आहे.
शुक्रवारला रात्री लाखांदूर येथील चंदन खत्री या तरुणाने घरची कार बाहेर काढली. त्यात चार मित्रांना बसविले. हे पाचही मित्र सायंकाळी गावात फिरले. त्यानंतर ‘धूम’ स्टाईल बाईक चालवितात तसे कार चालवायला निघाले. अंतरगावजवळ वळणावर वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने त्यांची कार झाडावर आदळली. त्यातच कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारच्या धडकेने करंजीची दोन झाडे मुळापासून उन्मळून कोसळली. होता. या अपघातात चंदन खत्री, सौरभ धोटे, प्रदीप तोंडरे या तिघांचा मृत्यू झाला.
सर्वत्र शोककळा
ऐन दिवाळीला अपघात घडून तीन तरुणांचा जीव गेल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी पानटपरीवर बसून मौजमजा करणे तर कधी केवळ पान-खर्रा खाण्यासाठी वडसा-ब्रम्हपुरीला दुचाकीने जावून सुसाट वेगाने वाहने चालविण्याचा हा छंद जीवावर बेतला. ही घटना रात्री घडल्यामुळे कुणालाही माहिती नव्हती. परंतु दिवस जसा उजाडला तशी गावावर शोककळा पसरली. आज दिवसभर गावात शोकाकूल वातावरण होते. दुपारच्यावेळी शोकाकूल वातावरणात तिघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठवड्यात पाच जणांचा मृत्यू
एका आठवड्यात लाखांदूर तालुक्यात तीन अपघात झाले. यात पाच जणांना जीव गमवावा लागला तर चार जण जखमी झाले. तरुणांमध्ये सुसाट वेगाने वाहने चालविण्याचा प्रकार वाढल्याने अपघातात वाढ होत आहे. पोलीस प्रशासनाने अनेकवेळा यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पालकवर्गाचा असंतोष असल्याने पोलीस प्रशासन हतबल झाले आहे.
मागील वर्षीही दोघांचा मृत्यू
मागील वर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी लाखांदूर येथे एका कुटुंबात मुली व जावई आले होते. सकाळी फिरण्यासाठी निघाले असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली होती. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे हे वळणमार्ग धोकादाय बनले आहे. (तालुका प्रतिनिधी)