पालोरा येथील घटना : परिसरात झाडे उन्मळली, वीज पुरवठा खंडीत, नुकसान भरपाईची मागणीकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील पालोरा परिसरात आज दुपारी ४.३० वाजता दरम्यान आलेल्या चक्री वादळासह पावसाने शामराव बुरडे यांच्या कुकूटपालन केंद्राचे मोठे नुकसान केले. चक्री वादळाने पोल्ट्रीचे छत व भिंती जमिनदोस्त झाल्या. सुमारे ४०० वर कोंबड्या दाबल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तलाठी पंचनाम्यानुसार सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले. गावातील कौलारु घरांना सुध्दा फटका बसला.पालोरा गावाबाहेर देव्हाडा ते साकोली राज्यमार्ग शेजारी शामराव बुरडे यांचे स्वमालकीच्या शेतजमीनीत ५ हजार कोंबड्याचे कुकूटपालन केंद्र असून आज दुपारी अचानक आलेल्या चक्रीवादळाने संपूर्ण कुकूटपालन केंद्र भुईसपाट केले. केंद्राच्या भिंती आतील कोंबड्यावर कोसळल्याने सुमारे ४०० कोंबड्याचा मृत्यू झाला. पावसामुळे मदत कार्यात अडचणी आल्याने कोंबड्याच्या मृत्यूची संख्या वाढली. वेळीच तलाठी घोडीस्वार यांना माहिती देण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळ गाठून नुकसानीचा पंचनामा केला. सुमारे ३ लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल त्यांनी वरिष्ठांना दिला. पालोरा येथील पंचायत समिती सदस्य महादेव बुरडे यांच्या वडिलांचे ते पोल्ट्रीफार्म आहे. परिसरातही चक्रीवादळाने नुकसान केले असून कौलारु घरांसह कच्चे मकान धराशही झाले. शेतकरी बुरडे यांचे यात अतोनात नुकसान झाले असल्याने त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
वादळाने पोल्ट्रीफार्मचे तीन लाखांचे नुकसान
By admin | Updated: May 21, 2016 00:38 IST