विविध अपघातांत तीन ठार
By Admin | Updated: February 28, 2015 00:53 IST2015-02-28T00:53:03+5:302015-02-28T00:53:03+5:30
लाखनी तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यातील एका अपघातात बसने लाखोरी जवळ दुचाकीस्वाराला धडक दिली.

विविध अपघातांत तीन ठार
लाखनी/पालांदूर : लाखनी तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यातील एका अपघातात बसने लाखोरी जवळ दुचाकीस्वाराला धडक दिली. दुसऱ्या अपघात केसलवाडा फाट्याजवळ तर पालांदूर जवळील देवरीगोंदी फाट्याजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
लाखनी : शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास फिरायला गेलेल्या मुरमाडी येथील सोमेश्वर दौलत घेटुले (४०) यांचा केसलवाडा फाट्यावर तर बसचा धडकेत बाम्पेवाडाजवळ केवळराम मेश्राम यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.
सोमेश्वर चेटूले यांचा किराणा व्यवसाय आहे. नित्याप्रमाणे ते श्रीराम वासनिक यांच्यासह पहाटे फिरायला गेले. दरम्यान साकोलीकडून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या भरधाव वेगाने त्यांना जबर धडक दिली. यात सोमेश्वर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर श्रीराम वासनिक हे जखमी झाले. अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी वासनिक यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अत्यवस्त असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहा. पोलिस निरीक्षक सोनटक्के, श्रीकांत मस्के, संतोष चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञान वाहनचालकाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
तर अन्य एका अपघातात एसटी बसच्या धडकेत लाखोरी जवळ केवळराम कुकटू मेश्राम यांचा मृत्यू तर खलील आमीर शेख हे जखमी झाल्याची घटना आहे.
तुमसरकडून पालांदूरकडे जाणाऱ्या तुमसर आगाराची बस ही लाखनीकडून मोटारसायकलने बाम्पेवाडाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत हा अपघात झाला. केवळराम मेश्राम हे बाम्पेवाडा येथील महात्मा गांधी हायस्कूल येथे कार्यरत आहेत. ते लाखनीवरुन बाम्पेवाडाकडे खलील आमीर शेख यांच्या मोटार सायकल क्रमांक एम एच ४९ ए १९३२ ने जात होते. दरम्यान तुमसर येथून पालांदूरकडे जाणारी तुमसर आगाराची बस क्रमांक एम एच ४० एन ९९८९ ची दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातात दुचाकस्वार रस्त्यावर कोसळले. यावेळी केवळराम मेश्राम यांच्या अंगावरुन बसची चाके गेल्याने त्यांचा चेहरा चेंदामेंदा झाला. तर शेख हा जबर जखमी झाला.
अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे नागरिकांमध्ये काळी काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी लाखनीचे ठाणेदार जयंत चव्हाण उपनिरीक्षक दिपक वानखेडे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. बसचालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पालांदूर : पालांदूर अड्याळ मार्गावरुन एका दुचाकीने तिर्रीला जाणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ डी ९३७८ ने धडक दिली. हा अपघात अड्याळ मार्गावरील देवरीगोंदी येथे गुरुवारी सांयकाळी ४ वाजताचा सुमारास घडला. यात दुचाकीवरील शारदा खुशाल नागोसे (४५) रा. तिर्री यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील अन्य दोघे गंभीर जखमी झाले. वळणावर ट्रॅक्टरची धडक लागल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी खुशाल नागोसे यांच्या तक्रारीवरुन पालांदूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. (शहर प्रतिनिधी/वार्ताहर)