हावडा रेल्वे मार्गावर तीन तास वाहतूक खोळंबली
By Admin | Updated: May 15, 2015 00:29 IST2015-05-15T00:29:14+5:302015-05-15T00:29:14+5:30
तांत्रिक बिघाडामुळे मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गासुमारे दोन ते तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

हावडा रेल्वे मार्गावर तीन तास वाहतूक खोळंबली
तुमसर : तांत्रिक बिघाडामुळे मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गासुमारे दोन ते तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. बुधवारी हा तांत्रिक बिघाड रात्री ७ ते ८ वाजताच्या सुमारास घडला. तुमसररोड रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला.
वादळी सुसाट वारा व पावसाने बुधवारी थैमान घातले होते. दरम्यान सालेकसा रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल अथवा ट्रक प्रणालीत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने एक्सप्रेससह इतर प्रवाशी गाड्या रेल्वे प्रशासनाला थांबवाव्या लागल्या होत्या.
तुमसर रोड रेल्वे स्थानकावर रात्री ९ वाजता येणारी इंटरसिटी एक्सप्रेस गाडी रात्री सव्वा वाजता पोहोचली. समता एक्सप्रेस व इतर प्रवाशी गाड्यांनाही याचा फटका बसला. तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील प्रवाशी व त्यांचे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. यांसदर्भात रेल्वे प्रशासनाला विचारले असता त्यांनी माहिती देण्यासाठी असमर्थता दर्शविली.
हायस्पीड रेल्वे व जागतिक दर्जाच्या सोसीयुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा हा दावा फोल ठरला आहे. मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्ग सातपुडा पर्वत रागांच्या जंगलातून जातो. दुतर्फा मोठमोठी वृक्ष आहेत. सुसाट वेगवान वारा व वादळी पावसामुळे हा रेल्वे मार्ग धोकादायक ठरत आहे. झाडे ट्रकवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीजेवर धावणाऱ्या गाड्या या मार्गावर आहेत. त्यामुळे धोक्याची आणखी शक्यता आहे. तुमसर हे शहर मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर वसलेले आहे. याठिकाणाहून दररोज शेकडो प्रवाशी आणि मालवाहू रेल्वे गाड्यांची वर्दळ असते. या मार्गावर उड्डाणपूल करण्याची मागणी अद्याप दुर्लक्षित आहे. (तालुका प्रतिनिधी)