तीन गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार
By Admin | Updated: October 15, 2014 23:16 IST2014-10-15T23:16:16+5:302014-10-15T23:16:16+5:30
तुमसर-मोहाडी विधानसभा मतदार संघातील सुरूरडोह, कमसासूर व विटपूर येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. तुमसर शहरातील

तीन गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार
तुमसर : तुमसर-मोहाडी विधानसभा मतदार संघातील सुरूरडोह, कमसासूर व विटपूर येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. तुमसर शहरातील एका मतदान केंद्रावर दोन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याच्या घटनेव्यतिरिक्त विधानसभा क्षेत्रात शांततेत मतदान झाले. विधानसभा क्षेत्रात सरासरी ६८ टक्के मतदान झाले. यात तुमसर शहरात ६५ टक्के, तालुक्यात ६६ टक्के, मोहाडी शहरात ६८ टक्के तर तालुक्यात ६५ टक्के सरासरी मतदान झाल्याची नोंद आहे.
तुमसर तालुक्यातील सुसुरडोह, कमकासूर, विटपूर या तीन गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. यांचे पुनर्वसन गर्रा बघेडा व रामपूर येथे झाले आहे. पायाभूत सुविधेपासून ही गावे वंचित आहेत. दोन वर्षापूर्वी या गावांचे पुनर्वसन करण्यात आले, परंतु मूलभूत सोयींचा येथे अभाव आहे. मोबदला योग्य मिळाला नाही. यासंदर्भात दि.२२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. बुधवारी मतदानाच्या दिवशी तहसीलदार सचिन यादव व इतर अधिकाऱ्यांनी गर्रा बघेडा व रामपूर येथे भेटी दिल्या, परंतु गावकऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला, अशी माहिती सरपंच किशोर उईके यांनी दिली.
दुपारी १२ वाजेपर्यंत तुमसर शहरात केवळ १४ ते १५ टक्केच मतदान झाले होते. पावसाची रिमझीम सुरू झाल्याने वेग मंदावला होता. दुपारी २ पर्यंत तुमसर शहर व तालुक्यात ३० ते ३५ टक्के मतदान झाले होते. तुमसर शहरातील ढगारे शाळेतील मतदान केंद्राबाहेर पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना चिन्ह सांगत असल्यावरून पक्ष कार्यकर्त्यात शाब्दिक वाद झाला होता. पोलिसांनी येथे तात्काळ मध्यस्थी केली.
एक तास उशिरा मतदान सुरू
देव्हाडी येथील मतदान केंद्र क्रमांक २५६ मध्ये एक तास उशिरा मतदान सुरू झाले. येथील ईव्हीएम मशीन मधील एका बटनला स्पर्श झाल्याने सेटींग बिघडली. ती पूर्ववत आणण्याकरिता एक तास कर्मचाऱ्यांना लागला. या दरम्यान २५ ते ३० मतदार मतदान न करता निघून गेले. झोनल आॅफीसर एस.यु. मडावी यांनी तात्काळ संपर्क करून आवश्यक त्या सूचना दिल्या. स्थानिक उमेदवारांच्या प्रतिनिधींनी एक तास अवधी वाढवून देण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली होती.
व्होटरस्लीप मिळाल्या नाहीत
भारत निर्वाचन निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारापर्यंत घरपोच स्लीप पाठविण्याची व्यवस्था आशा, तलाठी, जि.प. शाळांचे कर्मचाऱ्यामार्फत केली होती. लहान गावात घर शोधणे सापे जाते, परंतु मोठ्या गावात त्या स्लीप मिळाल्या नाहीत, अशा तक्रारी होत्या.
सुरळीत मतदान
तुमसर विधानसभा मतदारसंघात दुपारी ४ पर्यंत एकूण ५७ टक्के मतदान झाले होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू होती. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणताच त्रास झाला नाही. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मी संपर्कात होतो, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक लटारे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)