तीन कोटींचा खर्च गेला पाण्यात
By Admin | Updated: September 28, 2015 00:56 IST2015-09-28T00:56:31+5:302015-09-28T00:56:31+5:30
ग्रामीण भागातील गावे पाणी टंचाई मुक्त व्हावी, म्हणून प्रशासनाकडून तीन कोटी रुपये खर्च करून ब्राम्हणी येथे

तीन कोटींचा खर्च गेला पाण्यात
निश्चित मेश्राम पालोरा (चौ.)
ग्रामीण भागातील गावे पाणी टंचाई मुक्त व्हावी, म्हणून प्रशासनाकडून तीन कोटी रुपये खर्च करून ब्राम्हणी येथे जलप्राधिकरण योजनेचे भूमीपूजन केले होते. बऱ्याच प्रमाणात काम पूर्ण झाले होते. मात्र वारंवार पाईप लाईन लिकेज होत असल्यामुळे दोन आवठडयातच ही योजना गुंडाळण्यात आली. मागील पाच वर्षापासून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जलप्राधिकरण योजना भंगारात जमा झाली आहे. सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पवनी तालुक्यातील ब्राम्हणी येथे जलप्राधिकरण योजनेअंतर्गत मोठे मोठे जलकूंभ तयार करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळावे याकरिता जवळपास तिन कोटी रुपये खर्चून हि योजना तयार करण्यात आली. या योजनेअंतर्गत १३ गावाचा समावेश येतो.
यात बाम्हणी, पालोरा, सेंद्री, मावळ, कोंढा, कोसरा, आकोट, चिचाळ, मेंढा, पाथरी आदी गावांचा समावेश आहे. यापैकी अनेक गावांमध्ये आजही पाण्याची तिव्र टंचाई आहे. या गावांना मुबलक पाणी मिळावे हे प्रशासनाचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत वैनगंगा नदीतून पाणी ब्राम्हणी येथे जलकुंभात जमा करणे व ते पाणी शुध्द करुन सर्व गावांना पाणी पुरवठा करणे हे या योजनेचे उदिष्ट होते. याकरिता वैनगंगा काटेवर असलेले इंटगाव या गावाला लागून नदीच्या काठावर यंत्र सामुगी लावण्यात आली आहे. या यंत्राच्या साहाय्याने वैनगंगा नदीचे पाणी थेट या जलकुंभात जमा केले जात होते ते पाणी शुध्द प्रक्रिया करुन गावात पाणी पुरवठा केला जात होता. योजना पूर्ण होताच मोठया थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. दोन आठवडे ही योजना सुरु होती. मात्र सर्वत्र वारंवार पाईप लाईन लिकेज होत असल्यामुळे दुरुस्तीचे काम झपाटयाने सुरु करण्यात आले होते. मात्र जास्त खर्चामुळे काही दिवसातच कंत्राटदाराकडून काम बंद करण्यात आले.
तीन कोटी रुपये खर्चून बाधलेली जलप्राधिकरण योजना धुळखात उभी आहे. हि योजना सुरु करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधिनी धावपळ केली मात्र अजूनपर्यंत कूणालाही यश मिळाले नाही. योजना बेवारस असल्यामुळे अनेकांनी येथील साहित्य लंपास केले आहे. बाम्हणी ते कोंढा या ५ कि.मी. मध्ये टाकलेली पाईप लाईन बेपत्ता झाली आहे. ठिकठिकाणी उभे वाल फक्त जनतेला दिसत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेनी केली आहे.