तुमसर : आदिवासीबहुल पवनारखारी येथे डेंग्युचा उद्रेक झाला असून दोन मुलींना लागण झाल्याचे तपासणीनंतर आढळून आले. सध्या त्यांच्यावर तुमसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण गावालाच डेंग्युने विळखा घातला आहे. या गावात घरोघरी तापाने मुले फणफणले आहे. अशा या गावाला जिल्हा आरोग्य अधिकारी भेट देणार असल्याची माहिती आहे.तुमसरपासून ३५ कि़मी. अंतरावर जंगलात पवनारखारी नावाचे एक छोटे खेळे आहे. या गावातील नेहा धनराज चाचेरे (१०), ललीत चाचेरे (६), श्वेता दशरथ शिवरकर (८) यांना एका दिवसापुर्वी ताप आला. तपासणीसाठी त्यांच्या पालकांनी गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु उपचारानंतरही त्यांचा ताप दोन दिवस कमी झाला नाही. डॉक्टरांनी तुमसर येथे रेफर केले. उपजिल्हा रुग्णालयात उपचाराचा सुविधा नसल्याने ते परिसरातील एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले. परंतु आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने खर्च परवडणारा नाही. त्यांना परत गावी नेल्याची माहिती पंचायत समिती सभापती कलाम शेख यांना कळल्यावर त्यांनी त्या दोन मुलांना घेवून तुमसर येण्यास पालकांना सांगितले.आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास डॉ.अजय अग्रवाल यांच्या दवाखान्यात यांना दाखल करण्यात आले. डॉ.अग्रवाल यांनी डेंग्युचे पाझिटिव असल्याचे सांगितले. नेहा चाचेरे, ललीत चाचेरे व श्वेता शिवरकर यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च पंचायत समिती देणार असल्याचे शेख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.संपूर्ण गावात डेंग्युचा उद्रेक झाल्याची माहिती आहे. या गावाला उद्या जिल्हा आरोग्य अधिकारी पंचायत समिती सभापती कलाम शेख, तालुका आरोग्य अधिकारी तथा डॉक्टरांची चमू भेट घेणार आहे. या गावातील नागरिक सध्या भयभीत आहे. दोन दिवस या मुली प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही येथे भरती होत्या. तेव्हा आरोग्य प्रशासनाने दखल घेण्याची गरज होती.(तालुका प्रतिनिधी)
पवनारखारीत डेंग्युचा उद्रेक तीन बालकांना लागण
By admin | Updated: July 16, 2014 23:56 IST