एक एकरात तीन लाखांचे कारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2016 00:32 IST2016-09-11T00:32:34+5:302016-09-11T00:32:34+5:30

निलज खुर्द येथील महिला शेतकरी मिरा आगासे यांनी धानाची शेती परवडत नसल्यामुळे...

Three acres of land in one acre | एक एकरात तीन लाखांचे कारले

एक एकरात तीन लाखांचे कारले

लोकमत शुभवर्तमान : निलज खुर्द येथील मीरा आगासे यांनी फुलविली शेती
युवराज गोमासे करडी (पालोरा)
निलज खुर्द येथील महिला शेतकरी मिरा आगासे यांनी धानाची शेती परवडत नसल्यामुळे जिल्हा बँकेतून कर्ज काढून एक एकरात ड्रिप व प्लास्टिक मल्चिंगवर कारल्याच्या पिकाची शास्त्रीय पध्दतीने लागवड केली. कारल्याचे पिक बहरुन आले आहे.
एक महिन्यात तोड्यात ५५ ते ६० हजाराचे लाखांचे उत्पन्न हाती आले. उर्वरित तीन लाखांचे उत्पन्न होण्याचा अंदाज असून खर्च वजा जाता दीड ते दोन लाख रुपयांचा नफा मिळण्याची अपेक्षा असल्याचे मीराबाईनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
निलज खुर्द येथील मिरा भगवान आगासे या शेतकरी महिलेने धानाचा उत्पादन व खर्च परवडणारा नाही. मिळणाऱ्या भावात मोठी तफावत असते. त्यामुळे शेतीतील पिक पध्दतीत बदल करण्याचा मानस मिराबाईनी पती भगवान आगासे व मुलाकडे मांडला. त्यांचा विचार आधुनिक तंत्रज्ञानाचा व अधिक उत्पादन मिळवून देणारा असल्याने घरच्यांनी मदत दिली. कारल्याचे पिक तीन महिन्याचे असते.
पिकांची शास्त्रीय पध्दतीने लागवड करण्यासाठी भांडवल जिल्हा बँकेने दिले. त्यातून ड्रिप व प्लास्टिक मल्चिंग बरोबर बियाणे, खत, औषधी व अन्य साहित्याची खरेदी केली. एक एकरात सिजेंटा, अंकुर व व्हिएनआर कंपनीचे ९५० ग्रॅम, किंमत ६६५० रुपयांचे बियाणे ५ फुटावर सऱ्या पाडून ड्रिप मल्चिंगवर लागवड केली. वेलिंना अधार देण्यासाठी बांबू व केनचा वापर केल्याचे मिराबाई आगासे यांनी सांगितले.

असे मिळाले एकरी उत्पादन
कारल्याची लागवड जुनच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आली. १० आॅगस्टपासून कारल्याच्या तोडणीला सुरुवात झाली. रोज दोन ते अडीच पोते तोडा झाला. तुमसर शहरात थोक भावात २० ते ३० रुपयाने विक्री करण्यात आली. ८ सप्टेंबर पर्यंत २० क्विंटल उत्पादन मिळाले. त्यातून ५५ ते ६० हजाराचे उत्पन्न मिळाले. डिसेंबरपर्यंत कारल्याचा तोडा होणार असून जवळपास तीन लाखाचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.
खर्चाचे बजेट
लागवड ते उत्पन्न मिळण्यापर्यंत खत, बियाणे, मल्चिंग, ड्रिप, औषधी, प्लास्टिक, केन, बांबू, मजुरी, मशागत आदी व अन्य बाबींवर आतापर्यंत सुमारे एक लाखाचा खर्च आला. डिसेंबरपर्यत दिड लाखांचा खर्च अपेक्षीत आहे. उत्पन्नातून खर्च वजा जाता एक एकरात सुमारे दीड ते दोन लाखांचा शुध्द नफा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतीमधूनच कौटुंबिक गाडा व्यवस्थितरित्या सुरू आहे.

शेतीत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत यापूर्वी भाजीपाला पिके घेतले. काही भागात ऊस व धानशेतीही केली. शेतीच्या भरवशावर कुटूंब सांभाळून मुलगा पोलीस उपनिरीक्षक, मुलगी संगणक अभियंता तर लहान मुलगा ग्रॅज्युएट झाला. तंत्रज्ञानाने शेतीसाठी मुलाचा आग्रह असतो. पतीची साथ लाभते. कृषी विभागाच्या मदतीमुळे एक एकरातून लाखांचे उत्पन्न घेता आले. निसर्गाच्या दग्यामुळे शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीसोबतच अन्य शेतीचा प्रयोग करण्याची गरज आहे.
- मीराबाई आगासे,
शेतकरी, निलज खुर्द

पत्नी व मुलांच्या शेतीतील आवडीमुळे शेतीमध्ये नवनवे प्रयोग करता आले. शेतीची देखरेख व नियंत्रणाची कामे पत्नीच सांभाळते. तिच्या सहकार्यामुळेच कुटूंबाला व शेतीतून प्रगती साधता आली. अन्य शेतकऱ्यांनी सुध्दा परंपरागत पिक पध्दतीबरोर नाविण्यपुर्ण शेतीकडे वळावे, कृषी विभाग व तज्ज्ञांची मदत घेऊन उन्नती करावी. शेती प्रगत झाली तरच सर्वांची प्रगती साध्य होईल.
- भगवान आगासे,
शेतकरी निलज खुर्द

Web Title: Three acres of land in one acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.