‘स्वाईन फ्ल्यू’ची धास्ती
By Admin | Updated: February 19, 2015 00:30 IST2015-02-19T00:30:40+5:302015-02-19T00:30:40+5:30
स्वाईन फ्ल्यू आजाराने जिल्ह्यात ‘एन्ट्री’ केली आहे. यात लागण झालेल्या येथील ३८ वर्षीय इसमाचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

‘स्वाईन फ्ल्यू’ची धास्ती
भंडारा : स्वाईन फ्ल्यू आजाराने जिल्ह्यात ‘एन्ट्री’ केली आहे. यात लागण झालेल्या येथील ३८ वर्षीय इसमाचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच त्याच्या मुलीवर नागपूर येथे तर अन्य सात व्यक्तींवर औषधोपचार करण्यात येत आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा पहिला बळी गेल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.
शहरातील नेहरू वॉर्डातील भूषण चिंतामण सोनटक्के असे मृत इसमाचे नाव आहे. भूषण सोनटक्के यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना १६ फेब्रुवारी रोजी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर येथे दीड तास उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. १७ रोजी सांयकाळी त्यांचा स्वाईन फ्ल्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला असून त्यांच्या मुलीवर नागपूर येथे उपचार सुरू असल्याचे सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे त्यांच्या दालनात घेतलेल्या पत्रपरिषदेत पल्स पोलिओ व स्वाईन फ्ल्यूची माहिती दिली. यात त्यांनी, भूषणच्या घरातील पाच व्यक्तींना स्वाईन फ्ल्यूच्या आजाराची लागण झाल्याची तपासणी करण्यात आली. यात भूषण व त्यांच्या मुलीवर नागपूर येथे उपचार करण्यात येत होता. त्यातील भूषणचा मृत्यू झाला असून मुलीवर उपचार सुरू आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयातील पेर्इंग वॉर्डातील कक्ष क्रमांक १४ व १५ मध्ये स्वाईन फ्ल्यूच्या संशयीत रूग्णांवर उपचार करण्याची स्वतंत्र अद्ययावत व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. आज बुधवारला सायंकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात आणखी तीन संशयीत उपचारासाठी आले असता त्यांना रूग्णात दाखल करण्यात आले आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहे.
मृतक भूषणच्या घरातील पाच व्यक्तींपैकी तीन जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण नसली तरी त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आला आहे. मुलीच्या तपासणीत लक्षण आढळून आल्याने तिच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (शहर प्रतिनिधी)