तरुणांचा हजारोंचा धूर

By Admin | Updated: May 18, 2015 00:34 IST2015-05-18T00:34:52+5:302015-05-18T00:34:52+5:30

सिगारेट आरोग्यास घातक असते, हे माहीत असतानाही अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे ४० टक्के विद्यार्थी दररोज हजाराहून ...

Thousands of youths smoke | तरुणांचा हजारोंचा धूर

तरुणांचा हजारोंचा धूर

सिगारेटची नशा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची तलफ
भंडारा : सिगारेट आरोग्यास घातक असते, हे माहीत असतानाही अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे ४० टक्के विद्यार्थी दररोज हजाराहून अधिक सिगारेट पितात. प्रत्येक जण दररोज कमीतकमी ४ ते ५ सिगारेट सहज ओढतो. परिणामी, एक लाख रुपयांचा धूर इंजिनिअरींग कॅम्पस् बाहेर निघत असतो. अभ्यासाचे टेंशन हलके करण्यासाठी नव्हे तर फ्रेंड सर्कलमध्ये कोणी आपणास ‘मिठ्ठे’ म्हणून चिडवू नये यासाठी तोंडा-नाकातून धूर काढला जातो. धक्कादायक बाब म्हणजे हायस्कूलपासूनच ही तलफ लागल्याचे अनेकांनी मान्य केले.
उच्च शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नशेचे प्रमाण अधिक असल्याचे सत्य ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. मुलगा इंजिनिअरींगमध्ये शिकत आहे, असे अभिमानाने आई-वडील नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळींना सांगत असतात. मात्र, मुलगा कॉलेजमध्ये व हॉस्टेलवर काय दिवे लावतो, यापासून ते अनभिज्ञ असतात. आपण पाठविलेल्या पैशांचा तो कुठे कशावर खर्च करतो, हेसुद्धा त्यांना माहित नसते. याला काहीजण अपवाद असतात, हे तेवढेच सत्य. भंडाऱ्यात अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. येथील अनेक विद्यार्थी महाविद्यालयापेक्षा कॅम्पस् बाहेरील चहा-नाश्त्याच्या टपऱ्यांवरच जास्त वेळ बसलेले दिसतात. कारण, येथे चहा-नाशत्यापूर्वी मनसोक्त सिगारेट ओढण्यास मिळते. इतर खर्चात बचत करुन सिगारेटचा धूर करण्यात पैसा ओतला जातो, सदर प्रतिनिधीने काही कॉलेजच्या बाहेरील परिसरात रस्त्यावर चारपाच चहा टपऱ्या, नाष्टा स्टॉलवर दुपारी १ ते २.३० वाजेदरम्यान पाहणी केली असता. पाठीवर दप्तर व गळ्यात कॉलेजचे ओळखपत्र लटकविलेले विद्यार्थी गटागटाने येत होते. आल्यावर गप्पा मारता मारता सिगारेट पित होते. काही जण एकच सिगारेट चार ते पाच जण शेअर करताना दिसून आले. ‘सब मिल के सिगारेट पिणेसे प्यार बढता है’ असे त्यातील एका विद्यार्थ्याने सांगताच, बाकीच्यांनी एकामेकांना टाळ्या मारत आपण खूप मोठा तीर मारत असल्याचे दाखवून दिले.

Web Title: Thousands of youths smoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.