जिल्हा रुग्णालयात दररोज हजारांवर रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:12 IST2018-10-27T22:12:03+5:302018-10-27T22:12:24+5:30
दिवसा प्रचंड उन आणि रात्री निर्माण होणाऱ्या गारव्याने शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून दररोज जवळपास एक हजार रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात नोंद होत आहे.

जिल्हा रुग्णालयात दररोज हजारांवर रुग्ण
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिवसा प्रचंड उन आणि रात्री निर्माण होणाऱ्या गारव्याने शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून दररोज जवळपास एक हजार रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात नोंद होत आहे. वाढत्या गर्दीने रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने अनेक जण आर्थिक परिस्थिती नसतानाही खासगी रुग्णालयाचा रस्ता धरत आहेत. सध्या वातावरणातील बदलाने गावागावांत आजार आणि घराघरात रुग्ण दिसत आहेत.
पावसाने दडी मारल्यापासून वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. गत दीड महिन्यांपासून दररोज उन्हाळ्यासारखी उन्ह तापत आहे. गत आठवडाभरापासून रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पहाटे बोचरी थंडी ग्रामीण भागात जाणवते. या विषम वातावरणामुळे आजाराने डोके वर काढले आहे. डोकेदुखी, सर्दी, पडसे, ताप यासह विविध आजाराचे रुग्ण गावागावात दिसून येत आहेत. अंग कणकण वाटायला लागले की रुग्ण सुरुवातीला एखादी गोळी घेऊन घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यातून बरे वाटले नाही की रुग्णालयात धाव घेते. ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतात. मात्र या ठिकाणी त्यांना समाधानकारक उपचार मिळत नाही. त्यामुळे सर्वांची धाव भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे असते. शुक्रवारी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात ११४० रुग्णांची नोंद झाली. तर शनिवारी ९४३ रुग्ण येथे उपचारासाठी आले. या गर्दीवरूनच ग्रामीण भागात आजार किती मोठ्या प्रमाणात बळावले हे दिसून येते.
आजारी रुग्णांमध्ये सर्वाधिक बालक आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात वेळेवर उपचार होत नसल्याचे कायम ओरड आहे. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात नाईलाजाने धाव घ्यावी लागते. शहरातील बाल रुग्णालयात पाय ठेवायलाही जागा नाही. विविध चाचण्या करून उपचार करण्याच्या पद्धतीने रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा तर पुरता बोजवारा उडाला आहे. बाह्य रुग्ण विभागात डॉक्टर वेळेवर येत नाही. रात्रीच्या वेळी तर शिपायाशिवाय रुग्णालयात कुणीही भेटत नाही. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कारभारही गत काही दिवसांपासून ढेपाळल्याचे जाणवत आहे.
जिल्हा रुग्णालयाला घाणीचा विळखा
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला घाणीचा विळखा पडल्याचे दिसून येते. रुग्णांसोबत असणाºया नातेवाईकांचा रुग्णालयाला कायम गराडा पडलेला असतो. खर्रा, पानाच्या पिचकाºया आणि तंबाखू यामुळे रुग्णालयाच्या भिंती रंगल्या आहेत. रुग्णालयातील प्रसाधनगृहाचीही अवस्था अतिशय वाईट आहे. रुग्णालयाच्या परिसरात रस्त्यावर पार्कींग केली जाते. रुग्णालय परिसरात कायम दुर्गंधी असते.
शिस्तीसाठी हवेत डॉक्टर माले
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात चार वर्षापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.एकनाथ माले कार्यरत होते. शिस्तप्रिय असलेल्या डॉक्टरांनी या रुग्णालयालाही शिस्त लावली होती. या ठिकाणी येणाºया प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांनी तपासणी केली जात होती. तंबाखू, खर्रा आदी एका बॉक्समध्ये टाकल्या जात होता. तसेच अंतर्गत आणि बाह्य स्वच्छताही दररोज होत होती. आता येथील गचाळ अवस्था पाहून येथे जाणाºया प्रत्येकांना डॉक्टर एकनाथ माले यांची प्रकर्षाने आठवण येते.
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत ती कमीच आहे. विविध रिक्त पदांमुळे कार्यरत डॉक्टर व कर्मचाºयांवर कामाचा ताण येत आहे. रिक्त पदासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून लवकरच या बाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
-डॉ.माधुरी थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय