हजारों हेक्टर जमीन दलालांच्या विळख्यात
By Admin | Updated: August 28, 2014 23:34 IST2014-08-28T23:34:59+5:302014-08-28T23:34:59+5:30
साकोली परिसरात शासकीय जागा दिसली की, पैशाच्या बळावर अतिक्रमण करुन कब्जा करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नंतर ती जमीन लाखो रूपयाने विकण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे.

हजारों हेक्टर जमीन दलालांच्या विळख्यात
चौकशीची गरज : पैसे घेऊन चढविले जाते अतिक्रमण
साकोली : साकोली परिसरात शासकीय जागा दिसली की, पैशाच्या बळावर अतिक्रमण करुन कब्जा करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नंतर ती जमीन लाखो रूपयाने विकण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. यात अनेक दलाल सक्रीय झाले आहेत.
साकोली व परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय जागा आहे. काहींनी या जमिनी बळकाविल्या आहेत. काही दिवसांनंतर त्या जमिनी लाखोच्या किंमतीने विकण्यात आल्या. यात दलाल सक्रिय झाले आहेत.
या दलालांना अभय असल्याने त्यांच्या गोरखधंद्याने शासनाला कोट्यवधींचा फटका बसत आहे.
साकोली तालुक्यातील बऱ्याच गावात गुरे चराईसाठी, शाळा महाविद्यालयासाठी, सार्वजनिक मंदिर, बाजार, चौकासाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती. मात्र आता ही राखीव जागांवर अनेकांनी अतिक्रमण केल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. काहींनी गावालगत असलेल्या जागा शेतीच्या नावावर गिळंकृत केली, तर काहींनी गावातील रस्त्या लगतच्या जागा दुकानाच्या नावाखाली.
या प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेकांचे पितळ उघडे पडू शकते. न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या भागात अतिक्रमण झाले आहेत, त्याची चौकशी करून गुन्हे दाखल करा, असे आदेश असताना आदेशाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)