तुमसर : राष्ट्रीय वृध्दापकाळ पेन्शन योजनेंतर्गत शेकडो मृत लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा बँकेत पैसे जमा होणे, मागील दोन ते अडीच वर्षापासून सुरु आहे. केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्त निधी लाभार्थ्यांना देण्यात येतो. योजनेची दर तीन महिन्यांनी तपासणी करण्याचा नियम आहे. येथे शासन तथा प्रशासनाची दप्तरदिरंगाई दिसून येते.ज्या स्त्री व पुरुषांचे ६५ वर्षे पूर्ण झाले आहेत व ज्यांना आपल्या पाल्यांना आधार नाही अशा वृध्दांकरिता केंद्र व राज्य शासन राष्ट्रीय वृध्दापकाळ पेन्शन योजना राबविते हया योजनेत दर महिना लाभार्थ्यांना ६०० रुपये मिळतात. यात केंद्र शासन ४०० रुपये तर राज्य शासन २०० रुपये देते. तुमसर तालुक्यातील अनेक बँकात मृत्यू पावून दोन ते अडीच वर्षे झालेल्या शेकडो लाभार्थ्यांच्या खात्यात नित्यनियमाने दरमहा पैसे जमा होत आहे. भंडारा जिल्ह्यात तथा राज्यात हा आकडा लाखोंच्या घरात असल्याची शक्यता आहे. शासनाने येथे दर तीन महिन्यांनी या योजनेची माहिती संबंधितांकडून घेणे अनिवार्य आहे. परंतु शासन व प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे मृत लाभार्थ्यांच्या खात्यात निधीचा ओघ येथे सुरुच आहे.मृतक लाभार्थ्यांचा निधी बँकेकडून परत जाणे गरजेचे आहे. जिल्हा तथा विभागीय स्तरावर या योजनेचे स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह होतो. या योजनेची प्रकरणे तयार करतांनी संबंधित विभाग काटेकोर व नियमाचे पालन करते, पंरतु स्वत: नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
मृत लाभार्थ्यांच्या खात्यात हजारोंचा निधी
By admin | Updated: March 14, 2015 00:56 IST