‘त्या’ तरुणांनी काढली अंधारात रात्र
By Admin | Updated: September 13, 2014 01:02 IST2014-09-13T01:02:48+5:302014-09-13T01:02:48+5:30
माता वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी गेलेले भंडारा येथील तीन तरुण काश्मिरातील जलप्रलयाच्या सावटात अडकले.

‘त्या’ तरुणांनी काढली अंधारात रात्र
भंडारा : माता वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी गेलेले भंडारा येथील तीन तरुण काश्मिरातील जलप्रलयाच्या सावटात अडकले. भुस्खलन सुरू झाले, रस्त्यांवर पाणी साचल्याने मार्ग बंद झाले होते. अशा बिकट परिस्थितीत अडकलेल्या भंडारा येथील तिघांनीही स्वत:ला सावरत कुटूंबियांना सुरक्षिततेची माहिती दिली. मात्र काश्मिरातील पुरस्थिती बघून या तिन्ही मित्रांच्या अंगाचा थरकाप उडाला. धर्मशाळेने आमच्यासह अनेकांना तारल्याचा भयावह प्रसंग आणि हृदयाचा थरकाप उडविणारा प्रसंग भोजराज सोनकुसरे यांनी ‘लोकमत’समोर कथन केला.
शहरातील विदर्भ हाऊसिंग कॉलोनीतील भोजराज सोनकुसरे हे मित्र विजय बारई रा.मोहाडी व राहुल हटवार रा.सातोना यांच्यासह माता वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी ३ सप्टेंबरला भंडारा येथून निघाले. तिघेही जम्मू काश्मिरातील कटरा येथे पोहचल्यावर अस्मानी संकटांना त्यांना सामोरे जावे लागले. जम्मू-काश्मिर येथे अतिवृष्टी झाली. याचा फटका हजारो नागरिकांना बसला. पावसाच्या सपाट्यात भंडारातील हे तिघेही कटरा येथे सापडले. यावेळी जोरदार अतिवृष्टी सुरू झाल्याने अनेक सखल भागाला पावसाने कवेत घेतले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक मार्ग बंद झाले होते. अनेक ठिकाणी घरांच्या पडझडींसह रस्त्यांचे भुस्खलन झाल्याने वाहतूक बंद पडली होती.
अशा बिकट स्थितीत सोनकुसरे, बारई व हटवार यांनी आश्रयासाठी एका हॉटेलमध्ये गेले. सर्वत्र पूरस्थिती असल्यामुळे अनेकांनी माणुसकीचा परिचय देऊन एकमेकांना मदत केली. मात्र ज्या हॉटेलात आम्ही तिघेही थांबलो होते, त्या हॉटेल मालकाने चांगलेच लुबाडले. भोजनासाठी एका प्लेटसाठी ३०० रूपये तर एक कप चहासाठी २५ रूपये मोजावे लागले.
त्यातुलनेत धर्मशाळेत कमी पैशात उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. काश्मिरातील पुरपरिस्थितीमुळे सर्वत्र वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे ४ ते ८ सप्टेंबरला या तिघांनीही हॉटेलातील चार रात्री अंधारात काढाव्या लागल्या होत्या.
वीज पुरवठा खंडीत असल्याने मोबाईल बंद पडले होते तर एटीएम मशिनही वीजेअभावी बंद झाल्याने पैसे काढता येत नव्हते. अशास्थितीत जवळचे पैसे संपत आले होते. दरम्यान, त्यांनी एका एसटीडी बुथवरून घरी फोन करून ते सुखरूप असल्याचे सांगितल्याने कुटूंबीयांचा जीव भांड्यात पडला होता.
पावसाचा कहर सुरूच असताना दिवसभर हॉटेलच्या बाहेर पडून गावाकडे जाण्यासाठी काही साधन उपलब्ध होईल यादृष्टीने चाचपणी केली. मात्र मार्ग बंद असल्याने ते कटरा येथे अडकून पडले होते.
माता वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी निघालेले हे तिघेही कटरा येथे अडकल्याने पुढील प्रवास होऊ शकला नाही. ही स्थिती त्यांच्यासाठी चांगली झाली. जर तिघेही पुढील प्रवासात असते तर त्यांच्यावर याहीपेक्षा बिकट प्रसंग ओढविला असता. वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी गेलो मात्र निसर्गाला ते मान्य नसल्याने देवीच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळाली नाही, देवीचे दर्शन होऊ शकले नाही, ही मनात खंत असली तरी तिच्या कृपेनेच या कठिण प्रसंगातून सुखरूप गावाला परतलो असे, भोजराज सोनकुसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)