वन्यप्राणी अपघातातील ‘ती’ वाहने अद्याप बेपत्ताच
By Admin | Updated: December 13, 2015 00:31 IST2015-12-13T00:31:35+5:302015-12-13T00:31:35+5:30
भंडारा जिल्ह्यात घनदाट जंगल असून या जंगलात वन्यप्राण्यांची संख्या जास्त आहे. याच जंगलातून महामार्ग व राज्यमार्ग जात असल्यामुळे वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू झाले आहेत.

वन्यप्राणी अपघातातील ‘ती’ वाहने अद्याप बेपत्ताच
वनविभाग उदासीन : बिबट्यासह वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यू
संजय साठवणे साकोली
भंडारा जिल्ह्यात घनदाट जंगल असून या जंगलात वन्यप्राण्यांची संख्या जास्त आहे. याच जंगलातून महामार्ग व राज्यमार्ग जात असल्यामुळे वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. मात्र या वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने कोणतीही उपाययोजना अंमलात आणली नाही. शासन एकीकडे जंगले व वन्यप्राणी वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी अपघातापासून वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाही.
भंडारा जिल्ह्यातील बहुतेक जंगलाचा भाग हा नागझिरा व नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्पाला जुळलेला आहे. त्यामुळे या जंगलातील वन्यप्राणी पाण्यासाठी व खाद्यासाठी भ्रमंती करताना दिसतात. यातच महामार्ग ओलांडतांना अपघातात मृत्यूमुखी पडतात. अपघात मृत्यूमुखी पडलेल्या वन्यप्राण्यांची संख्या वर्षाकाठी शेकडोवर आहे.
शासन दरवर्षी जंगले व वन्यप्राणी यांना वाचविण्यासाठी जाहिरातीसह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कोट्यवधी रूपये खर्च करतो. मात्र प्रत्यक्षात जंगले व वन्यप्राणी यांच्या सुरक्षेवर किती आळा बसला याचे चिंतन शासनानेच करावे. कारण कितीही जनजागृती केली तरी दररोज वृक्षतोड, वन्यप्राण्यांच्या शिकारी या घटना घडतच आहेत. हे रोखण्यात वनविभाग अपयशी का ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.