'त्या' नोटा बनावटच
By Admin | Updated: September 24, 2014 23:24 IST2014-09-24T23:24:39+5:302014-09-24T23:24:39+5:30
तुमसर रोड देव्हाडी येथे बनावट नोटा छपाई करून त्यांची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणात सहा आरोपीविरूद्ध दि.१६ रोजी नागपूर एटीएसने २५० पानांचे आरोपपत्र दाखल केले.

'त्या' नोटा बनावटच
नाशिकचा अहवाल : ५०० व १००० च्या नोटांचा समावेश
तुमसर : तुमसर रोड देव्हाडी येथे बनावट नोटा छपाई करून त्यांची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणात सहा आरोपीविरूद्ध दि.१६ रोजी नागपूर एटीएसने २५० पानांचे आरोपपत्र दाखल केले. नाशिक येथून ३ लक्ष नोटांचा अहवाल दि.२३ मंगळवारी प्राप्त झाला. यासर्व नोटा ५०० व १००० बनावट असल्याचा खुलासा केला आहे. मुंबई येथून नोटा छपाई यंत्राची तपासणी अहवालाची येथे आता प्रतिक्षा आहे.
दि.२४ जुलैच्या मध्यरात्री नागपूर एटीएस पथकाने तुमसर रोड देव्हाडी येथून बनावट नोटा छपाईच्या यंत्रासह बंटी दवारे (२८) रा. गांधी वार्ड, विजय लिल्हारे (३०) नेहरू वॉर्ड व छोटू मेश्राम (३०) रा. स्टेशनटोली यांना अटक केली होती.
या टोळीने नागपूर येथे नकली नोटा चलनात आणल्या होत्या. नागपूर एटीएसने सापळा रचून नागपूर येथील गणेश उर्फ उदयसिंह निमजे याला ३ लाख २२ हजार ५०० च्या बनावट नोटा जप्त करून अटक केली होती. तपासात गणेश निमजे याने बनावट नोटा तुमसर रोड देव्हाडी येथून आणल्या होत्या, असे सांगितले.
तपासात चार आरोपींनी दिनेश कडू व दीपक पाठराबे यांच्या रॅकेटमध्ये समावेश असल्याची माहिती दिली. या सहा आरोपीविरूद्ध नागपूर एटीएसने दि.१६ सप्टेंबर रोजी २५० पानांचे आरोपपत्र नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. दरम्यान नागपूर एटीएसने बनावट नोटा नाशिक व नोटा छपाई यंत्र मुंबई येथे तपासणीकरीता पाठविले होते. यात नोटांचा अहवाल दि.२३ सप्टेंबर मंगळवारी प्राप्त झाला. यात ३ लाखांच्या नोटा बनावट असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ५०० ते १००० रूपयांच्या या नोटा आहेत. आता नोटा छपाई यंत्राचा अहवाल मुुंबईवरून येणे शिल्लक आहे, अशी माहिती एटीएसचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी दिली.
दि.२४ जुलै रोजी आरोपींना अटक केल्यावर आरोपींकडून प्रत्येक बिंदूवर कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणात आरोपीविरूद्ध भादंवि ४८९ (क), १२० (ब) तथा ४२० कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)