‘त्या’ मुलींना मिळणार सायकली

By Admin | Updated: January 3, 2015 00:38 IST2015-01-03T00:38:20+5:302015-01-03T00:38:20+5:30

मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सायकलींचे वाटप रखडल्यामुळे विद्यार्थिनींना पायीच शाळेत जावे लागत होते.

'Those girls will get bicycles | ‘त्या’ मुलींना मिळणार सायकली

‘त्या’ मुलींना मिळणार सायकली

राजू बांते मोहाडी
मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सायकलींचे वाटप रखडल्यामुळे विद्यार्थिनींना पायीच शाळेत जावे लागत होते. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांनी पत्र काढून सायकल वाटपाचे निर्देश जारी केले. त्यामुळे आता लवकरच शाळेत पायी येणाऱ्या मुलींना सायकली मिळणार आहेत.
शाळा सुरू होऊन सहा महिने झाले असताना मुलींना सायकली प्राप्त झाल्या नव्हत्या. या मुलींना मानव विकास योजनेतील बसचाही लाभ मिळत नव्हता. त्यामुळे तालुक्यातील मुलींना पायीच शाळेत जावे लागत होते.
‘लोकमत’मध्ये ‘मुलींची शाळेसाठी पायपीट’ हे वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी मुलींच्या समस्यांची माहिती घेऊन शिक्षण विभागाला याबाबत विचारणा केली. त्यानंतर शिक्षणाधिकारी (माध्य.) के.झेड. शेंडे यांनी मोहाडी, तुमसर, लाखनी, लाखांदूर व साकोलीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना माहिती विचारली. मानव विकास कार्यक्रम २०१४-१५ इयत्ता ८ वी ने १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किलोमिटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्याबाबत तत्काळ पत्र काढले. मानव विकास योजनेंतर्गत आता प्रत्येक तालुक्याला ६६६ सायकल वाटप करण्यात येणार आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांना दोन दिवसात लाभार्थी मुलींची यादी सादर करायची आहे. ज्या विद्यार्थिनींना मोफत बससेवा योजनेचा लाभ मिळत नाही अशा विद्यार्थिनींना मोफत सायकलीचा लाभ दिला जाणार आहे. आता शाळेमध्ये पायी येणाऱ्या मुलींच्या हातात सायकली येणार आहे. मानव विकास योजनेच्या मोहाडी तालुक्यात पाच बसेस धावतात. मोहाडी, कुशारी, रोहा बेटाळा या मार्गे येणारी बस रोहणा या गावी येत नाही. त्यामुळे रोहणा गावाच्या मुली बरेचदा नदीच्या पाणायातून पायवाट काढत पाच किलोमीटर अंतरावरून महात्मा जोतिबा फुले मोहगाव देवीच्या शाळेत येतात.
याबाबत सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलींना बससेवेचा लाभ देण्यात यावा यासाठी गटशिक्षणािधकाऱ्यांनी २९ डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हाधिकारी, परिवहन महामंडळाला पत्र दिले आहे.
वैनगंगा नदीच्या पलीकडे असणाऱ्या अर्धा मोहाडी तालुका मानव विकास योजनेच्या बस सेवेपासून दूर राहावे लागत आहे. मानव विकास योजनेतून मुलींना निदान दहावीच्या परीक्षेपूर्वी सायकली मिळायला पाहिजेत. जिल्ह्यात पाच तालुक्याचा मानव विकास योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. ज्या मुली शाळेत पायी येतात त्या मुलींसाठी जिल्ह्यात ३,३३० मोफत सायकली मिळणार आहेत.

Web Title: 'Those girls will get bicycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.