‘त्या’ आरोपींना कठोर शिक्षा करा
By Admin | Updated: February 25, 2017 00:21 IST2017-02-25T00:21:45+5:302017-02-25T00:21:45+5:30
लाखनी येथील सारंग शामकुवर याचा १३ फेब्रुवारला माडगी पुरकाबोडी जंगल शिवारात खून झाला.

‘त्या’ आरोपींना कठोर शिक्षा करा
सारंग शामकुवर खून प्रकरण : शिष्टमंडळाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
भंडारा : लाखनी येथील सारंग शामकुवर याचा १३ फेब्रुवारला माडगी पुरकाबोडी जंगल शिवारात खून झाला. तीन दिवसानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लाखनी येथील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी तपास अधिकाऱ्यांनी मृतकाच्या वडिलांना म्हणाले, आरोपीला न्यायालयात हजर करायचे आहे, असे बोलून परत पाठविले. आरोपींना अटक करण्यापूवीर तपास अधिकाऱ्यांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडले. घटनेपूर्वी मृतक व आरोपी यांनी मद्यप्राशन केले होते. त्यानंतर त्यांचे भांडण झाले. भांडणात छोटू आकरे, गोदु वासनिक, साकेत चामट व मृतक सारंग शामकुवर हे होते. त्यानंतर सारंगचा खून केल्याचे म्हटले आहे.
मुलगा सायंकाळी घरी न आल्यामुळे मृतकाचे वडील अजय शामकुवर यांनी लाखनी पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली. तत्पूर्वी लाखनी पोलीस ठाण्यात अवैध सावकारीबद्दल तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतरही पोलिसांनी अजय शामकुवर यांना बोलावून तुम्हाला पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्याचदिवशी कर्ज व त्यावरील व्याज २ लाख रूपये छोटु आकरे याला देण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर आरोपी अजय शामकुंवरकडे येऊन, पाहुन घेईन अशी धमकी दिल्याचे शामकुवर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
शिष्टमंडळाच्या मागण्या
सारंगचा खून हा अवैध सावकारीच्या व्यवहारामधून घडला असताना मनी लॉड्रिंग अॅक्टअन्वये गुन्हा दाखल न करता, कुणाचीही मागणी नसताना अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल का करण्यात आला, त्यामुळे या खून प्रकरणातून अॅट्रासिटीचा गुन्हा हटविण्यात यावा, लाखनीचे पोलीस निरीक्षक चकाटे व खून प्रकरणाच्या तपासाला प्रभावित करणारे चौकशी अधिकारी एपीआय नेवारे यांना निलंबित करण्यात यावे. खुनाचा तपास एलसीबीकडे देण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे देण्यात आले. शिष्टमंडळात पँथर ब्रिगेडचे अध्यक्ष परमानंद मेश्राम, दिनेश गिऱ्हेपुंजे, अचल मेश्राम, दिनेश वासनिक, अश्विनी भिवगडे, तुळसीराम गेडाम, किशोर खेडीकर, घनश्याम गिऱ्हेपुंजे, भगवान, भिकाराम बालाजी बागडे, चंद्रशेखर मेश्राम, विनोबा कांबळे, शामराव ठवकर, नितेश राजरतन मेश्राम, अनिल बावनकुळे, कालिदास खोब्रागडे, केशव रामटेके, हिवराज उके, विनोद रामटेके जयंत वासनिक, शुभम शामकुवर, अरविंद शामकुवर, माणिक मेश्राम, नयना शामकुवर, अजय शामुकवर, जयपाल घरडे यांचा समावेश होता. (जिल्हा प्रतिनिधी)
अॅट्रासिटी हटवा म्हणणारे पहिले प्रकरण
घटना ज्यामुळे घडली त्या गुन्ह्याखाली कलमा न लावता अॅट्रासिटी कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलीस स्वत:ची सुटका करून घेत दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे काम पोलिसांकडून होत असल्याचा आरोप पँथर ब्रिगेडचे अध्यक्ष परमानंद मेश्राम यांनी केला. अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रत्येक भांडण तंट्यात अॅट्रासीटी लावून पोलीस स्वत:ची जबाबदारी झटकतात. त्यामुळे पोलिसांनी तेढ निर्माण करू नये, म्हणून आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून अॅट्रासीटीची कलम काढण्याची मागणी केल्याचे मेश्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. अॅट्रासिटी कलम हटवा म्हणून सांगण्यात आलेले बहुधा हे पहिलेच प्रकरण असावे.