भीमा कोरेगावातून ते सुखरूप परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 22:17 IST2018-01-03T22:16:37+5:302018-01-03T22:17:55+5:30
भीमा कोरेगाव येथील इतिहासाची आठवण सदैव स्मरणात राहावी, यासाठी प्रत्यक्षात भेट देण्यासाठी गेलेल्या अड्याळ आणि चकारा येथील ३० भीमसैनिकांनी १ जानेवारी रोजी झालेला थरार जवळून पाहिला.

भीमा कोरेगावातून ते सुखरूप परतले
विशाल रणदिवे।
आॅनलाईन लोकमत
अड्याळ : भीमा कोरेगाव येथील इतिहासाची आठवण सदैव स्मरणात राहावी, यासाठी प्रत्यक्षात भेट देण्यासाठी गेलेल्या अड्याळ आणि चकारा येथील ३० भीमसैनिकांनी १ जानेवारी रोजी झालेला थरार जवळून पाहिला. तिथे झालेली इत्यंभूत माहिती त्यांनी लोकमतजवळ कथन केली. त्यांची आपबिती ही अंगावर थरकाप सोडणारी आहे.
अड्याळ आणि चकारा या दोन्ही गावातून एकुण ३० भीमसैनिक ३१ डिसेंबरच्या पहाटे अड्याळहून भीमा कोरेगावकडे रवाना झाले. १ जानेवारीला सकाळी ९ वाजता भीमा कोरेगाव येथे ते दाखल झाले. दरम्यान ११ ते १२ वाजताच्या सुमारास तेथील स्तंभाचे दर्शन घेतल्यानंतर ते वाहनाजवळ पोहचले. तेव्हा क्षणातच एका इमारतीहून मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. त्या दगडफेकीत नंदलाल मेश्राम, अरुण कऱ्हाडे, दिनेश राऊत, अंतकला वासनिक यांना दगडांचा मार सहन करावा लागला. दगडफेकीमध्ये भाऊराव राघो हुमणे रा.अड्याळ यांना गंभीर इजा झाली. अतिरक्तस्त्रावामुळे त्यांनी गर्दीतून धाव घेत आपला बचाव केला. सहकाºयांनी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. सध्या त्यांची प्रकृती बरी असल्याचेही जखमी व्यक्तींनी आपबिती सांगितली. वाहनाजवळ जाता जाता रस्त्यावर काचांचे तुकडे आणि दोन्ही बाजूला वाहन जळत होते. अड्याळहून जाणारे ३० ग्रामस्थ सुखरुप ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पोहचले. अड्याळहून जाणारे सुखरुप येताच आलेल्यांनी गावात आपबिती सांगितली. भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.