तिथे सापाचे विषही होते निष्प्रभ
By Admin | Updated: August 19, 2015 01:07 IST2015-08-19T01:07:06+5:302015-08-19T01:07:06+5:30
लाखांदूर तालुक्यातील परसोडी(नाग) येथील नागमंदिरात सर्पदंशाच्या अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून सापाचे विष निष्प्रभ करण्याची या मंदिराची आख्यायिका आहे.

तिथे सापाचे विषही होते निष्प्रभ
विरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील परसोडी(नाग) येथील नागमंदिरात सर्पदंशाच्या अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून सापाचे विष निष्प्रभ करण्याची या मंदिराची आख्यायिका आहे. नागपंचमीनिमित्त या मंदिरात भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. यात्रेत परिसरातील हजारो भाविक आपापल्या गावातील दिंड्यासह सहभागी होऊन नागदेवतेचे दर्शन घेतात.
या गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, येथे एक आख्यायीका प्रसिध्द आहे. त्यानुसार, एका शेतकऱ्याची पत्नी टोपलीमध्ये शिदोरी घेऊन शेतावर जात होती. याचवेळी नागराजाला पकडण्यासाठी काही गारुडी त्याच्या मागे लागले. ते पाहून नागराज सैरावैरा पळू लागला. दरम्यान त्याला टोपलीत शिदोरी घेऊन जाणारी महिला दिसली. त्याने तिला आपल्या टोपलीत आश्रय देऊन त्याच्या मागावर असलेल्या गारुड्यांपासून बचाव करण्याचा विनंती केला.
शेतकऱ्याच्या पत्नीने नागराजाची विनंती मान्य करुन त्याला आपल्या टोपलीत आश्रय देवून वाचविले. नागराजाचा पाठलाग करणाऱ्या गारुड्यांनी तिला नागराजाबद्दल विचारले. तेव्हा तिने नागराज तिकडे पळाल्याचे सांगून त्याची दिशाभूल केली आणि नागराजाचे गारुड्यापासून रक्षण केले. शेतकऱ्याच्या पत्नीने गारुड्यांपासून रक्षण केल्यामुळे नागराज त्या महिलेवर प्रसन्न झाले आणि तिला इच्छित वर मागण्यासा सांगितले. तेव्हा त्या शेतकरी महिलेने ‘‘माझ्या गावाची सीमा तुझ्या विषापासून मुक्त कर’ असा वर मागितला. नागराजाने तथास्तु म्हटले.
तेव्हापासून सर्पदंशाचा रुग्ण या गावाच्या सीमेत पोहचला तरी त्याला जीवनदान मिळते. परिसरातील जनतेमध्ये या मंदिराविषयी अपार श्रध्दा असून भाविकांच्या श्रध्देला अद्याप तडा गेलेला नाही.
लाखांदूर, पवनी तालुक्यातील अनेक सर्पदंशाचे रुग्ण या मंदिराच्या आशीर्वादाने ठणठणीत झाले आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे या गावाच्या सिमेत एकही आंब्याचे झाड नाही आणि नवीन आम्रवृक्षही या गावाच्या सिमेत जगत नाही.
नागपंचमीला परिसरातील अनेक गावातील हजारो भाविक आपापल्या गावापासून दिंडी घेवून येतात आणि यात्रेत सहभागी होऊन नागदेवतेचे दर्शन घेतात. (वार्ताहर)\