पालांदूर : कोरोना संकटाने मानव संकटात सापडला आहे. १ मेपर्यंत कडक लाॅकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठेसह इतरही ग्रामीण रोजगार प्रभावित आहेत. त्यामुळे लहान-मोठे धंद्यातून कुटुंबाचा अर्थगाडा संकटात आलेला आहे. रोजीरोटीला उतरती कळा आलेली आहे. शासनाच्या योजना जाहीर झाल्या. मात्र, लाभार्थ्यांपर्यंत अजूनही प्रतीक्षेत आहेत. हातावर पोट असणारे समस्येत आहेत.
ग्रामीण भागात पारंपरिक रोजगार आजही केले जातात. स्वतःचे बुद्धिकौशल्य सांभाळीत ग्रामीण कलेचा वारसा सांभाळला जातो. शहरात कारखान्यात तयार होणारी जीवनोपयोगी सामग्री ग्रामीण भागात हस्तकलेतून तयार होतो. शून्य खर्चात केवळ शारीरिक श्रमातून तयार होणारे शिंधीच्या झाडापासून केरसुणी, झाडू ग्रामीण भागात बऱ्यापैकी मागणी असते. घरात स्वच्छता अभियान राबविताना झाड व केरसुणीला मोठी मागणी असते. कुटुंबातील कर्ती मंडळी नदी नाल्याच्या काठावरील सिंधीच्या झाडापासून त्यांच्या फांद्या घरी आणीत. त्यांना विशिष्ट प्रक्रियेतून सुकवत झाडू केरसुणी बनवितात. २० ते ३० रुपयाला एक केरसुणी विकत संसाराचा गाडा हाकला जातो. मात्र, कोरोनाचे भयावह संकट उभे झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. मागणीच नाही, तर पैसा कुठून येणार!
भूमिहीन ग्रामीण जनता कोणत्या ना कोणत्या स्वउद्योगातून कौटुंबिक गुजराण करतात.
केवळ भूजांच्या (हाताच्या) भरोशावर पोट सांभाळतात. काही पात्र कुटुंब शासकीय योजनांच्या आधाराने कुटुंबाचा गाडा पुढे सारतात. वर्षभर श्रम उपसून जीवन जगणे एवढेच त्यांच्या नशिबी असते. शासनाने लाकडाऊन काळात वृद्धापकाळ योजनेत आगाऊ मानधन देण्याचे कबूल केले. राशन दुकानातूनही राज्य शासन व केंद्र शासन यांनी प्रतिव्यक्ती मोफत अन्नधान्य देण्याचेही जाहीर केले. लॉकडाऊन लागून १० दिवस पार पडूनही योजना पदरी पडले नाही. त्यामुळे गरिबांची विवंचना वाढलेली आहे.
चौकट /डब्बा
मायबाप सरकार तुमच्यावरच आमचे पोठ हाय. खेड्यापाड्यातही गावोगावी हिंडणे फिरणे बंद आहे. केरसुणी, झाडू यांना मागणी नाही.
कोट बॉक्स
लग्नसमारंभाला मर्यादा आल्या. पारंपरिक बँडचा धंदा आहे, पण त्यालाही कोणी विचारित नाही. म्हातारी आई, मुलाचा ३ नातवांसह संसार डोक्यावर आहे. तेव्हा आमच्याही पोटाचा विचार करा.
खुशाल बावणे, ज्येष्ठ हस्त कारागीर पालांदूर.