लग्न समारंभाच्या वेळीही दुकानांमध्ये गर्दी नाही

By Admin | Updated: April 28, 2016 00:34 IST2016-04-28T00:34:12+5:302016-04-28T00:34:12+5:30

सराफा व्यावसायिकांच्या बंदमुळे वर-वधू पालकांसाठी बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या.

There is no crowd in shops at the time of wedding ceremonies | लग्न समारंभाच्या वेळीही दुकानांमध्ये गर्दी नाही

लग्न समारंभाच्या वेळीही दुकानांमध्ये गर्दी नाही

सराफा व्यवसायावर दुष्काळाचे सावट : वधूच्या पालकांची सावध भूमिका
भंडारा : सराफा व्यावसायिकांच्या बंदमुळे वर-वधू पालकांसाठी बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यात सराफा व्यवसाय सुरू झाल्याने सराफा दुकानांत गर्दी दिसू लागली आहे. मात्र लग्न सोहळ्याच्या दृष्टीने सराफा व्यवसायात पाहिजे त्या प्रमाणात तेजी नसून, दुष्काळाचे सावट सराफा व्यवसायावर पडले आहे.
गत चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे प्रत्येकच व्यवसायावर दुष्काळाचे सावट आहे. सराफा व्यावसायिकांनी गत दोन महिन्यात ३५ दिवसांचा संप पुकारला. त्यामुळे त्यांना व्यवसायात नुकसान सहन करावे लागले. सराफा व्यवसाय आता सुरळीत सुरू झाल्यानंतरही दुष्काळाच्या सावटाखाली असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत.
सराफा व्यवसाय सुरू झाल्याने आता लग्न सोहळ्यांना झळाळी येणार आहे; मात्र पाहिजे तसा व्यवसाय होत नसल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. एक्साइज ड्युटी मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी देशभरात सराफा व्यावसायिकांनी आंदोलन छेडले. २ मार्च सुरू असलेले हे आंदोलन चक्क ११ एप्रिलपर्यंत सुरूच होते.
ऐन लग्न सोहळयाच्या काळात सराफा व्यावसायिकांच्या या आंदोलनामुळे मात्र वर-वधू पालकांची चांगलीच फसगत झाली होती.
आपल्या मुलामुलीला लग्नातील दागिने द्यायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला होता; मात्र ११ एप्रिल रोजी सराफा व्यावसायिकांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले व सराफा बाजार पुन्हा सुरू झाला. येत्या अक्षय्यतृतीयेपर्यंत लग्नांचा मुहूर्त असल्यामुळे बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. त्यात सराफा व्यावसायिकांचा बंद तात्पुरता मागे घेण्यात आल्याने पालकांकडून आतापासूनच दागिने खरेदी केली जात असल्याचे दिसते.
यामुळेच पालकांचे दागिन्यांना घेऊन असलेले टेंशन मिटले आहे. सराफा बाजार सुरू झाल्याने सराफा दुकानांत पुन्हा एकदा गर्दी दिसू लागली आहे. (नगर प्रतिनिधी)

वधूच्या पालकांची सावध भूमिका
लोकसभेच्या अधिवेशनात सरकार कोणता निर्णय घेतात? त्यानंतर सराफा व्यावसायिक पुन्हा संप करतात की निर्णय मान्य करतात, याकडे सध्या वधूच्या पालकांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात सराफा व्यावसायिकांनी संप केला, तर आपल्याला लग्नात अडचण निर्माण होऊ नये, याकरिता पालकांनी सावध भूमिका घेत आतापासूनच सोने खरेदी करण्याला सुरुवात केली आहे.

लक्ष आता शासनाच्या भूमिकेकडे
सराफा व्यावसायिकांनी त्याचा संप मागे घेतला असला तरी शासन सराफा व्यावसायिकांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते, त्यावर आता पुन्हा बंद पुकारायचा की नाही, हे स्पष्ट होणार आहे. सातत्याने जिल्ह्यात पडत असलेला दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भंडारा जिल्ह्याची बाजारपेठ ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे; मात्र याच व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बाजारपेठेत मरगळ पसरली आहे.

३५ दिवस सराफा बाजार बंद होता. त्यानंतर सुरू करण्यात आला तर त्यावर दुष्काळाचे सावट जाणवत आहे. लग्नासाठी काही नागरिक खरेदी करीत असले तरी दरवर्षीच्या तुलनेत खरेदी कमी प्रमाणात होते आहे.
- तुषार काळबांधे, सचिव, युवा सराफा असोसिएशन भंडारा

Web Title: There is no crowd in shops at the time of wedding ceremonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.