तेथे मिळते बालकांना संस्काराची शिदोरी
By Admin | Updated: May 11, 2014 00:07 IST2014-05-11T00:07:15+5:302014-05-11T00:07:15+5:30
पाश्चिमात्यकरणाच्या ओघात लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण संगणक, इंटरनेट अशाच साधनांचा वापर मनोरंजन आणि ज्ञानसंवर्धनासाठी करतात.

तेथे मिळते बालकांना संस्काराची शिदोरी
भंडारा : पाश्चिमात्यकरणाच्या ओघात लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण संगणक, इंटरनेट अशाच साधनांचा वापर मनोरंजन आणि ज्ञानसंवर्धनासाठी करतात. परीक्षा संपली. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की पालकही पाल्यांना अशा वेगवेगळ्या शिबिरांना पाठवून त्यांच्या इच्छा पूर्ण करीत असतात. मात्र अशा आधुनिकीकरणाच्या वातावरणात जरी कुणी हिंदू संस्कृती आणि तिचे संस्कार जीवंत राहावेत म्हणून ‘वारकरी बाल सुसंस्कार’ शिबिर घेत असेल तर ते कौतुकाचेच नाही का? तब्बल १०० हून बालकांवर व्रतबंधनाचे संस्कार करुन एका खेडेगावात सुरू असलेले हे शिबिर एक सुसंस्कारित पिढी घडविण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. पहाटे उठल्यापासून रात्री नीजेपर्यंत सतत सुुरू असलेल्या संस्काराच्या बिजरोपणामुळे नक्कीच शिबिरात आलेले हे शिष्य भविष्यात चांगले नागरिक म्हणून उदयास येतील, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील टेकेपार नावाचे गाव. या गावात मागील १७ दिवसांपासून एक शिबिर घेतले जात आहे. १० ते १६ वयोमर्यादेच्या बालकांवर चांगले संस्कार व्हावे, वारकरी संप्रदायाची ओळख होऊन या माध्यमातून हिंदू संस्कृतीचे रक्षण व्हावे या हेतूने प्रेरित होत हभप कृष्णानंद चेटुले महाराज यांनी त्यांच्या मुळगावी टेकेपार येथे या शिबिराचा घाट घातला. संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम संस्थानात सुरू असलेल्या शिबिरात नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील १०० हून अधिक बालके सहभागी झाली आहे. १ मे पासून १२ मे पर्यंत चालणार्या या शिबिरात एक सुसंस्कृत शिबिराच्या नावाने सुरू असलेल्या हिंदू संस्कृतीच्या जतनाचा प्रयत्न करणार्या या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक अन् प्रत्येक बालकावर शिबिराच्या पहिल्या दिवशी उपनयन संस्कार करण्यात आले. प्रत्येक बालकाचे ‘चौल’ करुन जाणवे परिधान करण्यात आले. आणि तेव्हापासून खर्या अर्थाने संस्काराला सुरुवात झाली. पांढरी बंगाली आणि पायजामा किंवा धोतर असा ड्रेसकोड सर्व प्रशिक्षणार्थींना देण्यात आला आहे. सकाळी उठल्यापासून त्यांची दिनचर्या सुरू होते. योग, प्राणायाम, ध्यान, संस्कृत भाषेचा अभ्यास, गायन म्हणजे भजनाचा सराव, गीतापाठ, विष्णु सहस्त्रनाम, हरिपाठ,प्रवचन अशा अनेक गोष्टी दिवसभरात प्रत्येकाला शिकविल्या जातात. त्यांची उजळणीही नित्याने घेतली जाते. आळंदीहून आलेले श्रीहरी महाराज, विठ्ठल महाराज, हभप जनार्दन कावळे महाराज या सर्वांना अज्ञात्माचे धडे देत आहेत. कोणत्याही प्रकारचा या सर्व गोष्टींचा गंध नसलेल्या बालकांनी शिबिराच्या पहिल्या दिवशी शिबिरात प्रवेश घेतला. मात्र त्यांच्यात झालेला बदल निश्चितच सकारात्मक आहे. ग्रामीण भागातील बहुतांश खेड्यांमधील बालकांचा समावेश या शिबिरात आहे. ज्यांना संस्कृत आणि इतर कोणत्याही गोष्टींचा कधी स्पर्र्शच झाला नाही. अशाही बालकांच्या तोंडात आज संस्कृत शब्द आपोआप येऊ लागले आहेत. मुखपाठ झालेला हरिपाठ, न अडखळता म्हटले जाणारे विष्णसहस्त्रनाम यातून नक्कीच बालकांवर चांगले संस्कार होणार यात शंका नाही. आज बालपणापासून शहरात असल्यास संगणक, इंटरनेटचे वेड किंवा ग्रामीण भागात उनाडक्या करीत फिरणार्या बालकांसाठी हा उपक्रम निश्चितच सकारात्मक बदल घडवूून आणणारा आहे. लहानांपासून व्यसनाधीनतेकडे वळणार्यांनाही एक दिशा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही करीत असल्याचे हभप चेटुले महाराज यांनी सांगितले. भविष्यात मोठ्या स्वरुपात अशा शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिबिराला आतापर्यंत आ.नाना पटोले, जि.प. सभापती अरविंद भालाधरे यांनी भेटी दिल्या. (वार्ताहर)