तत्कालीन सीईओ अहिरेंच्या "फाईल्स" उघडल्या
By Admin | Updated: June 29, 2017 00:46 IST2017-06-29T00:46:41+5:302017-06-29T00:46:41+5:30
जिल्हा परिषदचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांनी मोठ्या प्रमाणात अपहार व बेकायदेशीर काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तत्कालीन सीईओ अहिरेंच्या "फाईल्स" उघडल्या
चौकशी समिती भंडाऱ्यात डेरेदाखल : सर्व फाईल्सची सखोल तपासणी सुरू, मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषदचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांनी मोठ्या प्रमाणात अपहार व बेकायदेशीर काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी समिती भंडाऱ्यात दाखल झाली असून त्यांनी चौकशीला प्रारंभ केला आहे. आज दिवसभर त्यांनी अनेक फाईल्स हाताळल्या.
भंडारा जिल्हा परिषदचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांनी १० महिन्यांचा कालावधी भंडाऱ्यात काढला. २३ आॅगस्ट २०१६ ते २ मे २०१७ या त्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात निर्णयात्मक फाईल्सवर शेवटच्या क्षणात स्वाक्षऱ्या केल्या. यातील अनेक प्रकरणात शासकीय नियम बाजूला ठेऊन काम केल्याचा ठपका त्यांच्यावर विरोधकांनी लावला आहे. त्यांच्या कार्यकाळात आंतरजिल्हा बदली प्रकरण, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, यासह अनेक विकासात्मक कामे करण्यात आली.
या कामांमध्ये शासकीय नियम बाजूला ठेऊन मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. त्यांच्या शेवटच्या कार्यकाळात आंतरजिल्हा बदलीचे प्रकरण आताही गाजत आहे. तक्रारीच्या अनुषंगाने उपायुक्त (आस्थापना) कमलकिशोर फुटाने यांनी अहिरे यांच्या कार्यकाळातील संपूर्ण विभागातील केलेल्या संपूर्ण कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले. यासाठी त्यांनी चौकशी समिती गठित केली.
पाच सदस्य चौकशी समितीचे प्रमुख म्हणून सहायक आयुक्त (तपासणी) किटे यांची नेमणूक केली आहे. किटे यांच्यासह आयुक्तांनी विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांची या चौकशी समितीत नेमणूक केली आहे. २१ तारखेला या समितीच्या माध्यमातून भंडारा जिल्हा परिषदमध्ये चौकशी करण्यात येत असल्याचे पत्र निर्गमित करण्यात आले व २२ तारखेपासून अहिरेंच्या कार्यकाळातील कामांची चौकशी प्रारंभ झाली.
आज बुधवारला ही समिती भंडारा जिल्हा परिषदमध्ये सकाळी दाखल झाली. ही समिती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षालगत असलेल्या सभागृह कक्षात सर्व फाईल्सचे तपासणी करीत आहे. या समितीने सर्व विभागातील अत्यंत महत्वाच्या व आर्थिक व्यवहाराच्या फाईल्स मागवून घेतल्या आहेत. या फाईल्सची बारीकसारीक बाबींची चौकशी या तज्ज्ञ समिती सदस्यांकडून सुरू झाली आहे. अहिरे यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे. त्यांनी कामामध्ये अनियमितता केल्याचे आता कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहे. या समितीचे प्रमुख किटे यांची प्रतिनिधीने भेट घेतली असता चौकशी सुरू असून किती दिवस चालेल याबाबत अद्यापही सांगता येणार नाही, असे सांगितले.
वित्त विभागालाही मागितला लेखाजोखा
शरद अहिरे यांच्या कार्यकाळात कोठ्यवधी रूपयांची कामे करण्यात आली. या कामांमध्ये अनियमितता झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या समितीने जिल्हा परिषद वित्त विभागाला अहिरेंच्या काळातील सर्व आर्थिक व्यवहाराबाबतचा लेखाजोखा मागितला आहे. येत्या कालावधीत अहिरेंच्या कार्यकाळातील अनेक प्रकरणे या चौकशी समितीतून समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.