लाेकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथील जय किसान बहूउद्दशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने बोरी येथे खुल्या आवारात सुरू धान खरेदी केंद्रात वजनमापात तफावत व लूट होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. शुक्रवार रोजी करडी पोलीस ठाणेच्या आवारात वैधमापनशास्त्र विभाग तुमसर व साकोली येथील निरिक्षकांच्या चमूने शेतकऱ्यांच्या समक्ष केलेल्या तपासणीत वजनमापे नूतनीकरण झालेले नव्हते. तसेच ४० किलो वजनात ४०० ग्रॅमची तफावत आढळून आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.शेतकऱ्यांची लुट होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, तहसिलदार व करडीचे ठाणेदार यांना शेतकऱ्यांनी केली होती. प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्तात मोहाडी तालुका अन्न पुरवठा निरिक्षक सागर बावरे यांनी शेतकऱ्यांचे बयाण नोंदवित वजनमापे करडी पोलीस स्टेशनला जमा केली होती. ७ जानेवारी रोजी वैधमापन शास्त्र विभाग तुमसरचे निरिक्षक एम.डी. तोंडरे व साकोली विभागाचे निरिक्षक डी.सी. खुरसुंडे यांनी बजन मापांची तपासणी केली. वजन मापे नूतनीकरण झालेले नव्हते. तसेच दोन्ही काट्यांची प्रमाणित वजनाने तपासणी केली असता ४० किलोग्रॅम धान खरेदी करतांना ४०० ग्रॅम वजन जास्त घेत असल्याचे उघड झाले. तपासणीवेळी तक्रार शेतकरी सियाराम साठवणे करडी, प्रशांत बावणकर करडी तर पंच साक्षदार म्हणून शेतकरी मगेश साठवणे, पुंडलीक ढबाले, राजेश भडके, रामकृष्ण ढबाले, प्रकाश डोरले, भुवनेश्वर लोंदासे, गणेश ठवकर, योगेश साठवणे, पांडुरंग पंचबुद्धे, मंगल भोयर, सुभाष येळणे प्रामुख्याने उपस्थित होते. दोन्ही इलेक्ट्रॉनिक्स काट्यांची पंच व तक्रारदार शेतकऱ्यांसमक्ष सिलबंद करून ताब्यात घेण्यात आले. तसेच वैधमापनशास्त्र अधिनियम नियमानुसार खटला दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
केंद्र कायमचे बंद व नुकसान भरपाई द्या- धानाची चोरी व अवैधरित्या शेतकऱ्यांची लूट करणारे करडी येथील केंद्र काळया यादीत टाकून कायमचे बंद करण्यात यावे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, नवे केंद्र सुरू करण्यात यावे. तसेच केंद्र संचालकांवर कठोर कायदेशिर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धानाची मलाई कायम राखण्यासाठी तसेच कारवाई टाळण्यासाठी धावपळ सुरू असून राजकीय पक्ष बदल करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.