लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एमबीबीएस करून एमडी या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षीय डॉक्टरचा नदीत बुडून मृत्यू झाला. दुर्गेश शरद भाजीपाले (रा. शांतीनगर, भंडारा) असे मृत पावलेल्या डॉक्टरचे नाव आहे. तो मैत्रिणीच्या लग्नासाठी कोलकाताजवळील मयापूर येथे तो गेला होता. ही घटना सोमवार, २८ एप्रिल रोजी दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास घडली.
माहितीनुसार, दुर्गेश याने मुंबई येथून एमबीबीएसची पदती पूर्ण केली होती. त्यानंतर तो एमडीचे शिक्षण मुंबई येथे घेत होता. एमबीबीएस करत असताना तिच्या सोबतीला शिकत असलेल्या मैत्रिणीचे लग्न पश्चिम बंगालमधील मयापूर येथे होते.
आज आणणार दुर्गेशचे पार्थिव
- दुर्गेशचे पार्थिव आणण्यासाठी भंडारा येथील तिघेजण मयापूर येथे गेले आहेत. त्याचे पार्थिव ३० एप्रिलला बुधवारला सायंकाळी आणण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहेत.
- दुर्गेशचे वडील सेवानिवृत्त शिक्षक असून, आई गृहिणी आहे. दुर्गेशला एक लहान बहीण आहे. या घटनेने भाजीपाले कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भाजीपाले कुटुंबीय लाखनी तालुक्याच्या पिंपळगाव सडक येथील मूळ रहिवासी आहेत.
...अशी घडली घटनाकोलकाता येथे पोहोचल्यावर तो मयापूर येथे गेला. यावेळी त्याच्यासोबत त्याचे अन्य मित्र -मैत्रिणी होत्या. २८ एप्रिलला त्याने दाढी बनविल्यानंतर सगळे मित्र मैत्रिणी भगीरथ नदी काठावर फिरायला गेले. यावेळी दुर्गेशने चेहरा धुवायचा आहे, असे बोलून नदीपात्रात उतरला. चेहरा धूत असताना त्याची पँट ओली झाली म्हणून त्याने अंघोळ करण्याचा बेत आखला. नदीपात्रात उतरून डुबकी घेत असतानाच तो खोल पाण्यात बुडाला. आरडाओरड करूनही दुर्गेशला वाचविता आले नाही. बुडाल्याने त्याचा करूण अंत झाला.
आई-वडिलांची भेट ठरली अखेरची२९ एप्रिलला लग्न समारंभ असल्याने दुर्गेश मुंबईहून भंडारा येथे आला होता. २७ एप्रिलला भंडारा येथे पोहोचला. आई वडिलांची त्याने भेट घेतली. त्यानंतर त्याने ट्रेनने कोलकाता गाठले. २८ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या मित्रांनी भंडारा येथे दुर्गेशच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. आई - वडिलांशी दुर्गेशची भेट अखेरची ठरली.