जिल्ह्यातील रेती घाट लिलाव प्रक्रियेला झाली सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST2022-02-19T05:00:00+5:302022-02-19T05:00:53+5:30
महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असणाऱ्या नद्याचे पात्रात मध्यप्रदेशातील रेती माफियांची घुसखोरी सुरू झाली असल्याने नद्याचे पात्र पोखरले जात आहे. नद्यांच्या पात्रात रेतीऐवजी मातीच दिसून येत आहे. जिल्ह्यात घाट लिलाव नसताना रेतीचे बेधडक ट्रक धावत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील ५४ रेती घाट लिलाव प्रक्रियेला मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यातील रेती घाट लिलाव प्रक्रियेला झाली सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/ चुल्हाड : भंडारा जिल्ह्यातील ५४ रेती घाटाचे लिलाव प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरुवात केली आहे. ई निविदा ई लिलाव प्रक्रिया अंतर्गत घाटाचे लिलाव होणार आहे. तुमसर तालुक्यातील सर्वाधिक ११ घाटांचा यात समावेश असून बावणथडी नदीपात्रातील रेती मध्यप्रदेशातील रेती माफियानी पोखरल्याने पात्रात रेतीऐवजी आता मातीच शिल्लक आहे. माफियानी लिलावात असणाऱ्या वरपिंडकेपार गावांच्या हद्दीतून रेतीचा उपसा केलेला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असणाऱ्या नद्याचे पात्रात मध्यप्रदेशातील रेती माफियांची घुसखोरी सुरू झाली असल्याने नद्याचे पात्र पोखरले जात आहे. नद्यांच्या पात्रात रेतीऐवजी मातीच दिसून येत आहे. जिल्ह्यात घाट लिलाव नसताना रेतीचे बेधडक ट्रक धावत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील ५४ रेती घाट लिलाव प्रक्रियेला मंजुरी दिली आहे.
रेती घाट लिलाव प्रक्रिया ९ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. २३ फेब्रुवारीला ई लिलाव पद्धतीने घाट लिलावात काढण्यात येणार आहेत. भंडारा तालुक्यातील वडेगाव रिठी, मांडवी, कोथुर्णा, जुनी टाकळी, पवनी तालुक्यातील वलनी, शिवनाळा, पवनी, गुडेगाव, जुनेना, येनोळा, तुमसर तालुक्यातील चारगाव, बाह्मनी, सुकळी दे, ढोरवाडा, तामसवाडी, पांजरा रे, मांडवी, वरपिंडकेपार, सोंड्या, चांदमारा, मोहाडी तालुक्यातील पांजरा, पाचगाव, पाचगाव, टाकली, रोहा, बेटाळा, नीलज, ढिवरवाडा, मुंढरी, खमारी साकोली तालुक्यातील गिरोला, महालगाव, सालेबर्डी, ओटेकर, खंडाळा, परसोडी लाखनी तालुक्यातील पळसगाव, मिरेगाव, भूगाव, विहीरगाव, नरव्हा, लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी, आसोला, लाखांदूर, मोहरणा, गवराळा, आंतरगाव, विहिरीगाव, भागडी, खैरणा अशा गावातील घाटाचा यात समावेश करण्यात आलेला आहे.
माती लिलावात काढणार काय?
- तुमसर तालुक्यातील यात सर्वाधिक ११ घाटांचा समावेश असून बावणथडी नदीच्या काठावरील वरपिंडकेपार आणि सोंड्या गावे आहेत. या दोन्ही घाटांची रेती मध्यप्रदेशातील रेती माफियांनी पोखरले आहे. घाट लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असतानासुद्धा रेतीचा उपसा सुरूच आहे. मध्यप्रदेशातील रॉयल्टीच्या आधारावर विदर्भातील जिल्ह्यात रेतीची विक्री करीत आहेत. वरपिंडकेपार गावांच्या हद्दीत रेतीचा तुटवडा असल्याने जिल्हा प्रशासन आता माती लिलावात काढणार काय? असा सवाल आहे.