बेरोजगारीवर केली मात, गावात थाटले सर्व्हिस सेंटर
By Admin | Updated: June 4, 2016 00:18 IST2016-06-04T00:18:35+5:302016-06-04T00:18:35+5:30
स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील युवक युवतीना विविध प्रकारच्या स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देते.

बेरोजगारीवर केली मात, गावात थाटले सर्व्हिस सेंटर
लोकमत शुभवर्तमान : उद्योगप्रियतेने दिली साथ
भंडारा : स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील युवक युवतीना विविध प्रकारच्या स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देते. याच प्रशिक्षणाचा फायदा घेऊन डोंगरी बुजुर्ग या गावातील विलास गेडाम या तरुणाने गावातच दुचाकी दुरुस्तीचे दूकान थाटुन उत्तम कमाई सुरु केली आहे. त्याच्या उद्योगप्रियतेमुळे एकाच वर्षात त्याने स्वत: च्या मालकीचे सर्विस सेंटर सुरु करण्याची तयारी केली आहे.
मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग हे सुमारे चार हजार लोकवस्तीचे गाव, मॅगनीज खाणीसाठी ओळखले जाते. या गावात धानाची शेती आणि मॅग्नीज खाणीवर काम करणारे मजूर आहेत. याच गावातील विलास गेडाम हा तरुण तुमसरला एका सर्विस सेंटर मध्ये सहाय्यकाचे काम करायचा अशातच त्याला स्टार स्वयंरोजगार केंद्रामार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण उपक्रमाची माहिती मिळाली. त्याने मोहाड़ी येथील संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रात दुचाकी दुरुस्तीच्या एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. येथे दुचाकी दुरुस्तीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यानंतर तुमसर येथील अमितभाई सर्विस सेंटर मध्ये १ वर्ष नोकरी केली.
दुरुस्तीच्या कामात तरबेज झाल्यावर विलास ने स्वताच्याच गावात वडिलांच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात दुचाकी दुरुस्तीचे काम सुरु केले. त्यासाठी खाजगी पतसंस्थेकडून ५० हजाराचे कर्ज घेतले. यातून दुचाकी दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य, हवा भरण्याचे यंत्र, गाडी धुण्याचे यंत्र खरेदी केले. त्याच्या या सर्विस सेंटर मध्ये सर्व मॉडेलच्या दुचाकी दुरुस्ती तसेच चारचाकी गाड्यांचे वॉशिंग केले जाते.
विलासचे दिवस रात्र परिश्रम आणि गाडी दुरुस्तीचे कसब पाहुन त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली. केवळ १ वर्षाच्या कालावधीत त्याचा चांगला जम बसला असून त्याने ५० हजाराच्या कर्जार्ची परतफेड केली. गावातील एका मुलाला त्याच्या दुकानात रोजगारही दिला आहे.
घराच्या बाजूला असलेल्या जागेत नविन अत्याधुनिक सर्विस सेंटर उभारण्याचे काम मनात जिद्द असली तर गावात सुद्धा स्वयंरोजगारातून आर्थिक संपन्नता मिळवता येते हे विलासने दाखवुन दिले आहे. परिस्थिती अभावी इंजिनियरिंगची पदवी पूर्ण करता आली नाही म्हणून हार न मानता त्याने गावातच उद्योग सुरु केला. त्याच्या उद्योगामुळे इतर तरुणानाही प्रेरणा मिळत तरुणांनी गावात पान टपरीवर किंवा चौकड़ी करुन कॅरम खेळत टाइमपास करण्यापेक्षा रोजगाराभिमुख कौशल्य शिकून ग्रामीण भागातच स्वयंरोजगार उभारुन संपन्नतेचा संदेश त्याने दिला आहे. (प्रतिनिधी)