ठाणा नळयोजना निकामी
By Admin | Updated: February 27, 2016 01:04 IST2016-02-27T01:04:11+5:302016-02-27T01:04:11+5:30
बोरगाव नदीवर बांधण्यात आलेल्या खराडी व राजेदहेगाव शेतशिवारात कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याच्या अपव्यय होत आहे.

ठाणा नळयोजना निकामी
लोखंडी पाट्या चोरीला, बंधारे निरुपयोगी
जवाहरनगर / खरबी : बोरगाव नदीवर बांधण्यात आलेल्या खराडी व राजेदहेगाव शेतशिवारात कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याच्या अपव्यय होत आहे. आघाडी शासनाच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधारे अखेरच्या घटका मोजत आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यांचे पुनरूज्जीवन युतीच्या काळात होईल का, असे प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
जलयुक्त शिवार अभियान ही युती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यानी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. यातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. परंतु कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशाने गावापासून वाहणाऱ्या नदीवर बंधाऱ्याची संकल्पना मांडण्यात आली होती. आघाडीच्या कार्येकाळात सन १९९२ मध्ये खराडी येथे कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. कंत्राटदाराच्या निकृष्ट बांधकामामुळे बंधारा खालील भागाला पोकळ झाल्यामुळे पाण्याची साठवण बंद झाली व पुर्ण पाणी वाहून जात असते या बंधाऱ्याला १६ दारे असून यांची लोखंडी पाट्या चोरीला गेला आहे. १२ वर्षापुर्वी याच बंधाऱ्याच्या दुरूस्तीवर खर्च करण्यात आला. परंतु पाणी ना अडले ना जमिनीत जिरले. ठाणा पेट्रोलपंप येथे येथून जाणारा जलवाहिनी पाण्याअभावी निष्पळ झाली आहे. राजेदहेगाव व खराडी येथे बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले बंधारे निकामी पडलेले आहेत.
जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून जुन्या बंधाऱ्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र बांधलेले कोल्हापुरी बंधारे क्षुल्लक किमतीच्या लोखंडी प्लेट व खालील भागाला काँक्रेट अभावी दुरूस्तीची प्रतिक्षा करीत आहे. शेतकऱ्यांचे जीवन मान उंचविण्यासाठी व हरीतक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने मोहिम हाती घेवून शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचवण्याची गरज आहे. मात्र नवीन बंधारे बांधण्यासाठी लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यांची डागडुजी केल्यास उन्हाळ्यात होणारा पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होईल व अशावेळी जनावरांना पिण्यासाठी पाणी व शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल व पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होईल. (वार्ताहर)