ठाणा पोलीस मदत केंद्र दुर्लक्षित
By Admin | Updated: December 16, 2014 22:47 IST2014-12-16T22:47:04+5:302014-12-16T22:47:04+5:30
तालुक्यातील जवाहरनगर पोलीस ठाणे अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले. मात्र कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्याचा वचक नसल्याने हे केंद्र बंद अवस्थेत आहे. परिणामी चोरांना

ठाणा पोलीस मदत केंद्र दुर्लक्षित
प्रल्हाद हुमणे - जवाहरनगर
तालुक्यातील जवाहरनगर पोलीस ठाणे अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले. मात्र कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्याचा वचक नसल्याने हे केंद्र बंद अवस्थेत आहे. परिणामी चोरांना व अवैध व्यावसायीकांना रान मोकळे झाले. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ होत होती. रस्त्यालगत असणाऱ्या गावात चोरी करणारे भामटे महामार्गावरून पळून जात होते. अपघात, चोरी, डकैती, अपराधीक घटना झाल्यास फिर्यादींना राष्ट्रीय महामार्गापासून चार ते सहा किलोमीटर अंतर पार करून पोलीस ठाणे जवाहरनगर गाठावे लागत होते. परिणामी जनतेला वेळेवर योग्य न्याय मिळत नव्हता.
जनतेला व महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहतुकदारारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. या बाबींची दखल घेत दिनदयाल देशभ्रतार यांच्या प्रयत्नाने २००६ मध्ये गृहखात्याच्या मंजुरीनंतर शासनाने मदत केंद्राची निर्मिती केली होती. त्यानुसार खराडी, खरबी नाका, चिखली, ठाणा पेट्रोलपंपकरिता एक बिट पोलीस हवालदार व शिपाई तर नांदोरा, शहापूर, गोपीवाडा, उमरी, फुलमोगरा, अशोकनगर अंतर्गत एक पोलीस हवालदार व शिपाई आणि एक सहायक पोलीस निरीक्षकची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार गृहखात्याकडून विश्रांती घेण्यासाठी दोन बेड व दैनिक व्यवहाराकरिता कपाट, टेबल, वायरलेस सेट आदी आवश्यक साहित्य पुरवठा करण्यात आले. मागील नऊ-दहा महिन्यांपासून पोलीस मदत केंद्र उघडले नाही. त्यामुळे ते धुळखात पडलेले आहे. ग्रामपंचायत ठाणा पेट्रोल पपंपने उपलब्ध करून दिलेल्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचांची तोडफोड झालेली आहे. लोखंडी खेळण्या चोरीला गेले आहेत.
या ठिकाणी फक्त २६ जानेवारी, १ मे व १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात येते. एखादा मोठा मंत्री आला की ही इमारत पोलीस कर्मचाऱ्यांनी सज्ज होते. मागील महिन्यात ठाणा-शहापूर रस्त्यादरम्यान लाखो रूपये किंमतीचे साहित्य असलेले टेलर उलटलेला होता. त्या मधील साहित्य चोरट्यांनी लंपास केले.
हाकेवर असलेले पोलीस मदत केंद्र सुरू असते तर लाखोचे सामान चोरीला गेले नसते. पोलीस कुणासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यासाठी की सर्वसामान्य माणसाचे संरक्षण करण्यासाठी, हा येथे एक प्रश्न आहे.
परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणा येथील बंद पोलीस मदत केंद्र सुरू करण्याची नितांत गरज आहे. जवाहरनगर येथे एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक व एक सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असून ३४ कर्मचारी आहेत. ठाणा टी-पॉर्इंट हे संवेदनशील स्थळ असल्याने येथे कायमस्वरूपी रस्ता वाहतुक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.