मंडळ सदस्यांनी आणले बनावट पत्र
By Admin | Updated: September 2, 2014 23:30 IST2014-09-02T23:30:33+5:302014-09-02T23:30:33+5:30
शाळेत लिपीक नसलेल्या व्यक्तीला लिपीक दाखवून त्याच्या चुकीमुळे संस्थेवर आर्थिक भुर्दंड पडला अशी बतावणी करून न्यायालयात दावा दाखल करणाऱ्या संस्थाध्यक्ष आणि शिक्षण मंडळ सदस्यांनी

मंडळ सदस्यांनी आणले बनावट पत्र
तुमसर : शाळेत लिपीक नसलेल्या व्यक्तीला लिपीक दाखवून त्याच्या चुकीमुळे संस्थेवर आर्थिक भुर्दंड पडला अशी बतावणी करून न्यायालयात दावा दाखल करणाऱ्या संस्थाध्यक्ष आणि शिक्षण मंडळ सदस्यांनी पुरावा दाखल जोडलेले मंडळाचे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी न्यायालयाने हा दावा खारीज केला असून मुख्याध्यापक असलेले व शिक्षण मंडळ सदस्य राजकुमार बालपांडे यांनी परीक्षेची रक्कम व्याजासह भरावी असे आदेश आहेत. याप्रकरणी बालपांडे यांच्याविरुद्ध बोर्डाकडून कारवाई करण्याचे संकेत आहेत.
पूजा शिक्षण संस्था तुमसर द्वारा संचालित शारदा विद्यालय तथा कन्या कनिष्ठ विद्यालय तुमसर येथे गोपी बडवाईक हे लिपीक पदावर नसतानाही त्यांना लिपीक असल्याचे दाखविण्यात आले. शाळेतील वर्ग १० च्या ४२ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज व शुल्क बडवाईक यांनी वेळेच्या आत बोर्डाकडे सादर केले नाही. या आशयाचे संस्थेला परीक्षा शुल्क आणि दंड म्हणून ५७ हजार १२० रुपये मंडळाकडे भरावे लागेल असा आरोप करीत संस्थाध्यक्ष महावीर प्रसाद अग्रवाल यांनी बडवाईक यांच्याविरुद्ध प रीक्षा शुल्क अफरातफरीचा दावा दिवाणी न्यायालय तुमसर येथे दाखल केला होता. पुराव्यादाखल त्यांनी बोर्डात रक्कम भरल्याचे पत्रही न्यायालयात सादर केले होते. मात्र हे पत्र बोगस असल्याचे नंतर उघडकीला आले. शिक्षण मंडळ कार्यालयात संस्थेने रक्कम भरली नाही, मंडळाने असे कोणतेही पत्र दिले नाही. तसेच तशी नस्तीही मंडळ कार्यालयात नाही. अशी माहिती बोर्डाने दिल्यानंतर ही बनवाबनवी उघडकीला आली. परिणामी बडवाईक यांच्याविरुद्धचा दाखल केलेला दावा खारीज करण्यात आला. शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षण मंडळ सदस्य असलेल्या राजकुमार बालपांडे यांनी संगनमत करीत तसे बनावट पत्र असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणात गोपी बडवाईक यांना विनाकारण गोवण्यात आल्याचे त्यांचे धाकटे बंधू सचिन बडवाईक यांनी सांगितले. तसेच हा सगळा प्रकार माहितीच्या अधिकारान्वये कागदपत्रांच्या आधारे उघडकीला आली. शिक्षण मंडळ सदस्य बालपांडे यांचा हा कारभार चव्हाट्यावर आल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांच्य बनावट स्वाक्षरीचे खोटे पत्र सादर करून न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा मागणीची तक्रार सचिन बडवाईक यांनी शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे केली केली. त्यावर सुनावणी घेऊन शिक्षण संचालकांनी प्रकरण निकाली काढण्याचे आदेश शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना दिले होते. या प्रकरणात दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत मंडळाने निष्कर्ष नोंदविले होते. संस्थेने सादर केलेल्या पत्रावर मंडळाचा शिक्का नाही. बोर्डाला जमा केलेल्या रुपयांची नोंद बोर्डाच्या रोकड बुकमध्ये नाही. असेही न्यायालयाने नमुद केले आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही सचिन बडवाईक यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)