हातमाग विणकरांसाठी ‘कापड स्पर्धा’
By Admin | Updated: March 3, 2016 00:45 IST2016-03-03T00:45:14+5:302016-03-03T00:45:14+5:30
मनुष्याच्या अंगात वेगळे काही करण्याची कला असते. मात्र त्या कलेला प्रोत्साहन मिळत नसल्याने उत्तम कारागीर समाजासमोर त्याची कला सादर करू शकत नाही.

हातमाग विणकरांसाठी ‘कापड स्पर्धा’
उत्कृष्ट कारागिरांना पुरस्कार : उपनिबंधक सहकारी संस्थेचा उपक्रम
भंडारा : मनुष्याच्या अंगात वेगळे काही करण्याची कला असते. मात्र त्या कलेला प्रोत्साहन मिळत नसल्याने उत्तम कारागीर समाजासमोर त्याची कला सादर करू शकत नाही. जिल्ह्यात हातमाग उद्योग आहे. मात्र त्याला शासनाकडून पाहिजे त्याप्रमाणात प्रोत्साहन मिळत नसल्याने हातमाग केंद्र केवळ नावापुरते उरले आहेत. अशा उत्तम कारागिरांसाठी कापड निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या वतीने ही स्पर्धा भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालयाच्या सभागृहात शनिवारला आयोजित करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यातील हातमाग कापड निर्मिती करणाऱ्या कलावंतांना त्यांनी तयार केलेले परंपरागत हातमाग कापड ज्यात साड्या, लुगडी, लुंगी, खनाळी, धोतर आदी तर अपरंपरागत हातमाग कापड उत्पादनात टॉवेल, चादर, शर्टिंग कोटिंग पडद्याचे कापड, मफलर, शॉल, वॉलहॅगिंग आदी तयार केलेले साहित्य या स्पर्धेत आणू शकतात.
सन २०१५-१६ मध्ये हातमाग कापडाच्या उत्तम नमुन्यासाठी स्पर्धा व बक्षीस योजनेंतर्गत हातमाग कापड स्पर्धा घेण्याचे सूचित केले आाहे. त्या अनुषंगाने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील हातमाग सहकारी संस्था, खासगी व इतर विणकरांना या स्पर्धेत भाग घेता येईल. उत्कृष्ट कापडांच्या निर्मितीसाठी कारागिरांना दोन्ही विभागातील विजेत्यांना वेगवेगळी रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या हातमाग विणकर स्पर्धकांनी नगामध्ये असणारे असलेले कापड कमीत कमी १ नग व मीटरमधील नमुने कमीत कमी २ मीटर आपले संपूर्ण नाव, मोबाईल नंबर व पत्ता तसेच कापडाचे विवरण किमतीमध्ये द्यावे. त्याचप्रमाणे हातमाग विणकरांनी निवासी पुराव्यासह व कापड वाणासह स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे. सदर स्पर्धेकरिता निवड समिती गठित करण्यात आली असून बक्षीसपात्र नमुन्याचे बक्षीस जाहीर करणे, एकही नमुना बक्षीसपात्र न ठरविणे किंवा बक्षिस विभागून देण्याबाबतचा अंतिम निर्णय निवड समितीचा राहील.
या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या हातमाग विणकर स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये नाव नोंदणीकरिता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पर्यवेक्षक (हातमाग) संदीप निर्वाण यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)