शिक्षकांची टीईटी परीक्षेकडे पाठ
By Admin | Updated: November 4, 2014 22:35 IST2014-11-04T22:35:00+5:302014-11-04T22:35:00+5:30
मागील वर्षीपासून राज्य शासनाने राज्यभरातील सर्व भावी तसेच १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रूजू झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या कार्यरत शिक्षकांना शिक्षक

शिक्षकांची टीईटी परीक्षेकडे पाठ
मागील वर्षीच्या तुलनेत घट : जिल्ह्यात ५५०० अर्ज प्राप्त
भंडारा : मागील वर्षीपासून राज्य शासनाने राज्यभरातील सर्व भावी तसेच १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रूजू झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. जिल्हाभरातून ५ हजार ४९९ अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत केवळ ५० टक्केच अर्ज प्राप्त झाले असून यंदा भावी शिक्षकांनी टीईटी परीक्षेकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदच्या माध्यमातुन पात्रताधारकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यातील ५ हजार ४९९ भावी शिक्षकांनी अर्ज सादर केले आहे. त्यात इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ३ हजार २४३, सहावी ते आठवीसाठी १ हजार २९३ तर पहिली ते आठवीसाठी ९६३ जणांनी अर्ज सादर केले आहेत. तीन्ही प्रवर्गात भंडारा तालुक्यात १ हजार ४१६, पवनी ६१३, तुमसर ७६२, लाखांदूर ५०३, साकोली ९८०, मोहाडी ३७९ तर लाखनी तालुक्यातून ८४७ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे.
मागीलवर्षी १५ डिसेंबर २०१३ रोजी भंडारासह राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीने या परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला होता. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील पात्र भावी शिक्षकांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता.
गतवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. मागीलवर्षी झालेल्या टीईटी परीक्षेचा निकाला जाहिर होऊन सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र शिक्षक पात्रता परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना नोकरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पात्र ठरलेल्या भावी शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचा सुर आहे. शासनाने शिक्षक पदाची भरती न करता पुन्हा यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेचा बिगुल फुंकला आहे. यंदा गतवर्षीप्रमाणे टीईटी परीक्षेत खुल्या उमेदवारांना ५० टक्के गुणांची तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४५ टक्के गुणांची अट करण्यात आली आहे. शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार इयत्ता पहिली ते पाचवी तसेच इयत्ता सहावी ते आठवीला अध्यापन करणाऱ्या शिक्षण सेवक उमेदवाराला शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. ही शिक्षक पात्रता परीक्षा १४ डिसेंबरला घेण्यात येणार आहे.
मागीलवर्षी टीईटी परीक्षेसाठी केवळ जिल्हास्तरावरच आॅनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा होती. मात्र, यावर्षी प्रथमच या परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यात सातही तालुकास्तरावर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. या परीक्षेसाठी २७ सप्टेंबरपासून ३० आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. जिल्हाभरातून टीईटी परिक्षेसाठी ५ हजार ४५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)