मोहन भोयर लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर नगरपरिषदेअंतर्गत विशिष्ट नागरी सेवा निधीअंतर्गत शासनाचे ई-निविदा पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेल्या निविदेत बांधकाम विभागातील तत्कालीन अभियंते व तीन कंत्राटदारांनी संगनमत करून निविदा प्रक्रिया प्रभावित केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे प्रकरण फौजदारी कारवाईसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यामुळे नगरपरिषदेत खळबळ माजली आहे.
निविदा क्रमांक २०२३ डीएमए ८९६७०५२ बाबत नगरपरिषद प्रशासनाला तक्रार प्राप्त झाली होती. त्यात येथील बांधकाम विभागातील तत्कालीन अभियंत्यांशी संगनमत करून निविदा प्रक्रिया प्रभावित केल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार ही निविदा प्रकाशित करण्याची तारीख व सादर करण्याचा अंतिम दिनांक यात अंतर आठ दिवस असणे आवश्यक होते. तसेच ई-निविदा पोर्टलवरही असणे आवश्यक होते. परंतु मे. आनंद ठाकूर, मे. सर्वेश कन्स्ट्रक्शन कंपनी, धनेशकुमार धावडे, गोंदिया या तिन्ही कंत्राटदार व बांधकाम अभियंत्यांनी संगनमत करून २१ एप्रिल २०२३ रोजी सदर निविदा सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटाला प्रकाशित करून त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटाला समाप्त केली.
एकाच संगणकावरून झाला सर्व गैरप्रकार
- हा सर्व गैरप्रकार एकाच संगणकावरून करण्यात आला. प्रथमतः शुद्धिपत्रक प्रकाशित केले. त्याच संगणकावरून तिन्ही निविदादेखील सादर केल्या.
- कंत्राटदार आनंद जी. ठाकूर, मे. सर्वेश कन्स्ट्रक्शन कंपनी, धनेशकुमार पी. धावडे गोंदिया यांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल व फसवणूक, इतर कंत्राटदारांना स्पर्धा करण्यापासून वंचित ठेवणे, कायद्याची पायमल्ली करून कामे मिळवली आहेत.
- परिणामी संबंधित कंत्राटदारांना लेखी खुलासा ४८ तासांत समक्ष सादर करण्याचे आदेश नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक जुम्मा प्यारेवाले यांनी दिले होते. मात्र त्यांनी यासंदर्भात लेखी म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे हे तिन्ही कंत्राटदार आणि तत्कालीन बांधकाम अभियंत्यांवर कारवाईचे संकेतही मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. आता होणाऱ्या कारवाइकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
असा केला घोळ२९ एप्रिल २०२३ रोजी संबंधित कंत्राटदारांनी नगरपरिषदेतील बांधकाम विभागातील तत्कालीन बांधकाम अभियंते यांना हाताशी धरून हा प्रकार केला. निविदा उघडण्याचा दिनांक २ मे २०२३ असल्याने या तांत्रिक बाबीचा गैरफायदा घेऊन २९ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २:२७ ला शुद्धिपत्रक अपलोड केले. त्यात निविदा समाप्तीचा दिनांक २९ एप्रिल २०२३ ला दुपारी ३ पर्यंत करण्यात आला. या ३२ मिनिटांत कंत्राटदार आनंद जी. ठाकूर, मे. सर्वेश कन्स्ट्रक्शन कंपनी, धनेशकुमार पी. धावडे गोंदिया यांनी निविदा सादर केल्याचे दिसून येत आहे.
५ मिनिट सुरू होती सर्व निविदा प्रक्रीयानिविदा प्रक्रिया राबविताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले. संगनमताने हा सर्व प्रकार घडला. कुणालाही कायद्याचा धाक नव्हता, असे दिसून आले.
"या प्रकरणाचा कायदेशीर तपास सुरू आहे. या संदर्भात फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे."- जुम्मा प्यारेवाले, मुख्याधिकारी तथा प्रशासक, नगरपरिषद, तुमसर