निविदा ‘वर’ उड्डाण पूल ‘खाली’
By Admin | Updated: November 24, 2014 22:51 IST2014-11-24T22:51:31+5:302014-11-24T22:51:31+5:30
तुमसर रोड येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाची निविदा (जास्त) वर गेल्यामुळे त्या मान्यतेच्या प्रस्तावाला नियमानुसार मंत्रालयातून हिरवी झेंडी मिळणे आवश्यक आहे. दि.२ मार्च रोजी या उड्डाण

निविदा ‘वर’ उड्डाण पूल ‘खाली’
मंत्रालयातून हिरवी झेंडीची प्रतीक्षा
मोहन भोयर - तुमसर
तुमसर रोड येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाची निविदा (जास्त) वर गेल्यामुळे त्या मान्यतेच्या प्रस्तावाला नियमानुसार मंत्रालयातून हिरवी झेंडी मिळणे आवश्यक आहे. दि.२ मार्च रोजी या उड्डाण पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते. प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत असताना आता निविदा ‘वर’ गेल्यामुळे उड्डाण पूल ‘खाली’ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर तुमसर रोड येथे रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ तथा राज्य महामार्ग रामटेक-तुमसर-तिरोडा-गोंदिया १३५/६०० कि़मी.च्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधकामाला रेल्वे व राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ६० टक्के निधी राज्य सरकार व ४० टक्के निधी केंद्र सरकार खर्च करणार आहे. राज्य शासनाने येथे निविदा काढली होती. यात एकाच कंत्राटदाराने निविदा भरली. ती निविदा जास्त आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर येथील मुख्य अभियंत्यांना जादा निविदा मंजूर करण्याचा अधिकार नसल्यामुळे या निविदेला मंत्रालयातून मंजुरीची गरज आहे. सध्या ही फाईल नागपूर येथे रखडली आहे. २ मार्च २०१४ ला या उड्डाणपुलाचे भूमिपूजन तत्कालीन केंद्रीयमंत्री प्रफुल पटेल यांनी केले होते. परंतु कामाला सुरूवात झाली नाही. या उड्डाणपूल बांधकामाला ४३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. १८ कोटी रेल्वे तर २५ कोटी राज्य सरकार देणार आहे. केंद्रीय रस्ते विकास निधीतून २५ कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
रेल्वे ट्रॅकवरील पुलाचे बांधकाम रेल्वे प्रशासन करणार आहे. टॅ्रकवरील पुलाची लांबी ८०.४२५ मीटर, २ गाळे १८ मीटर तर एक गाळा ३६ मीटरचा आहे. अप्रोच मार्गाचे बांधकाम राज्य शासन करणार आहे.
यात रामटेककडे जाणाऱ्या मार्गाची लांबी ३९५ मीटर, तुमसरकडे जाणाऱ्या मार्गाची लांबी १२८ मीटर आहे. गोंदियाकडे जाणारा रस्ता ४.१ मीटर दोन्ही अॅप्रोच मार्ग राज्य शासन तयार करणार असून याची लांबी एक कि़मी. आहे.
या पुलाची एकूण लांबी १,१४१ मीटर, रूंदी १२ मीटर गोंदिया व तुमसरकडे जाणाऱ्या अप्रोचेसमध्ये प्रत्येक बाजूला ६ मीटर रूंदीचा एक सब वे, पूलाच्या दोन्ही बाजूला ४.५० मीटर रूंदीचा सर्व्हीस रस्ता आहे. एक अंडरपास ४.५० मीटर रूंद व २.५० मीटर उंच आहे. रेल्वेनेसुद्धा येथे निविदा काढलेल्या नाहीत.
तुमसररोड रेल्वे फाटकावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. या मार्गावरुन दररोज १२० ते १२५ मालवाहू व प्रवासी रेल्वे धावतात. दर ५ ते ७ मिनिटाला फाटक बंद होते. लाखो प्रवाशांची कुचंबना होत आहे. मागील १५ वर्षापासून या रेल्वे उड्डाण पुलाचे काम सातत्याने रखडत आहे.
बांधकामाचे कंत्राट मिळावे यासाठी कंत्राटदारांच्या उड्या पडतात, येथे एकाच कंत्राटदाराने निविदा भरली तेही जादा दराने. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधीनी हा विषय रेटून धरण्याची गरज आहे.