अस्थायी परिचारिकांच्या सेवा नियमित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 01:03 IST2016-12-26T01:03:39+5:302016-12-26T01:03:39+5:30
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त अस्थायी नर्सेसच्या सेवा डिसेंबरपासून

अस्थायी परिचारिकांच्या सेवा नियमित होणार
भंडारा : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त अस्थायी नर्सेसच्या सेवा डिसेंबरपासून नियमित करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांनी मुंबई येथील आरोग्य भवनात आयोजित संघटनेच्या बैठकीत म.रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य महासचिव एस.टी. गायकवाड यांनी दिले.
बैठकीत परीक्षा दिलेल्या व न दिलेल्या अशा दोन्ही नर्सेसच्या सेवा डिसेंबर २०१६ पासून नियमित होणार असून सेवा ज्येष्ठतेचे लाभही त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून मिळणार आहेत. तसेच २०११ ते २०१६ पर्यंतच्या सर्व बंदपत्रीत अधिपरिचारिकांच्या सेवा टप्प्या टप्प्याने नियमित होणार आहे.
एन.एच.एम. कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुद्धा सुरु झाली आहे. सर्व रिक्त पदे जानेवारी २०१७ पर्यंत भरली जाणार आहेत.
नर्सेसची फार्मसी व केसपेपर कामे बंद व्हावीत, प्रशासकीय बदल्यातून परिचारिकांना वगळण्यात यावे, बायोमेट्रीक प्रणाली, इमरजन्सी, ओ.पी.डी. व बिल्डींगची कामे करावयास न लावणे,परिचारिकांच्या विविध संवर्गाचे पदनाम बदलाबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविणे इत्यादी विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीत कास्ट्राईबचे विविध पदाधिकारी, नर्सिंग विभागाचे अध्यक्ष पुंजाजी सागर, अतुल कांबळे इत्यादी उपस्थित असल्याचे कास्ट्राईब राज्य ज्येष्ठ उपाध्यक्ष अमृत बन्सोड व भंडारा जिल्हाध्यक्ष गुलशन गजभिये यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)